आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेने लग्नास नकार दिल्यामुळे तिचे बनावट एफबी अकाउंट बनवून बदनामी, अशी आली घटना उघडकीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - विवाहित शिक्षिकेस नवऱ्याला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करण्याचा आग्रह केल्यानंतर शिक्षिकेने नकार दिला. यानंतर तिचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करुन पुन्हा शिक्षिकेच्या वडिलांना, भावाला फोनवरून धमक्या दिल्याप्रकरणी तरुणाविरोधात माजलगाव शहर ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.


पीडित शिक्षिका शहरातील एका इंग्रजी शाळेत कार्यरत असताना त्याच शाळेत वर्षभरापूर्वी विशाल मारोती दवणे(रा. पूर्णा, ता. परभणी) हा क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाला होता. एकाच शाळेत कार्यरत असल्याने दोघांमध्ये चांगली ओळख झाली. शिक्षिका व तिच्या नवऱ्याचे सतत भांडण होत असल्याने विशाल दवणे याने “नवऱ्याला घटस्फोट दे मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलाचा सांभाळ करतो, असे शिक्षिकेला सांगितले. मात्र, तिने यासाठी नकार दिला.  यानंतर तीन महिन्यांनी नाेकरी सोडून तो दुसरीकडे नोकरीला लागला. यानंतरही त्याने शिक्षिकेच्या भावाच्या मोबाइलवर संपर्क करुन तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुझी बदनामी करेल, असे म्हणत शिव्या दिल्या. यानंतर त्याने शिक्षिकेच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट सुरु करून त्यावर शिक्षिकेचे फोटो टाकले व त्या अकाउंटवरुन बदनामीकारक पोस्टही टाकल्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिक्षिकेच्या भावाने विशाल याला अकाउंट बंद करण्यास सांगितले होते. मात्र, त्याने अकाउंट सुरू ठेवले. बदनामीकारक पोस्टमुळे शिक्षिकेला नोकरीही सोडावी लागली. या प्रकरणी शिक्षिकेने माजलगाव शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विशाल मारोती दवणे (रा. पूर्णा, जि. परभणी) याच्या विरोधात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान करत आहेत. 
 

 

अशी आली घटना उघडकीस 
बनावट फेसबुक अकाउंटवरून शिक्षकाने इतर काही मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. शाळेतील अन्य एका शिक्षकालाही रिक्वेस्ट पाठवून शिक्षिकेच्या नावे त्याच्याकडून शाळेतील कार्यक्रमांचे फोटो मागितले.  शिक्षिका शाळेत गेल्यावर त्या शिक्षकाने तुम्हाला नेमके कोणते फोटो हवेत, अशी विचारणा शिक्षिकेकडे केल्यावर मी कोणतेच फोटो मागितले नाहीत, असे शिक्षिकेने सांगितले आणि बनावट अकाउंट वापरात असल्याचे या वेळी निदर्शनास आले.