आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांचा नकार, तरी गोविदंभाई श्रॉफ यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवू घातले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी |

औरंगाबाद - निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षातील संबंध टोकाचे होतात. मात्र, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांतील मैत्रीपूर्ण संबंध आजवर चर्चेत आहेत. प्रचारादरम्यान ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकचंद पहाडे यांच्या कार्यकर्त्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या आघाडीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराला ही बाब समजताच त्यांनी विरोधकांच्या जेवणाची सोय केली. पहाडे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नेत्यांपैकी एक होते. स्टेट काँग्रेसमध्ये श्रॉफ यांच्या पुरोगामी गटाचे ते पुरस्कर्ते होते. काँग्रेसशी मतभेद होऊन गोविंदभाईंचा गट बाहेर पडला. गाेविंदभाईंनी "लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स' ही संघटना स्थापन केली. त्याची जयसूर्य नायडूंच्या पीपल्स पार्टी, कम्युनिस्ट पार्टी व कामगार किसान पक्षाशी आघाडी केली. पहाडे मात्र अखेरपर्यंत काँग्रेसचे निष्ठावान राहिले. पोलिस अॅक्शन झाल्यानंतर स्टेट काँग्रेसचे कार्यालय औरंगाबादला सुरू झाले. जिल्हाध्यक्ष म्हणून पहाडेंची नियुक्ती झाली. 
 

सहकारी झाले विरोधक
१९५२ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जाहीर झाली. पहाडेंना उमेदवारी मिळाली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते कोठूनही उभे राहिले तरी निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसला होता. इतरांच्या सोयीसाठी माणिकचंद यांनी शहराऐवजी औरंगाबाद ग्रामीणमधून (फुलंब्री मतदारसंघ) निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात गाेविंदभाईंच्या आघाडीतील शेकापचे फुलंब्रीजवळील वारेकिनगाव येथील तुकाराम चव्हाण उभे होते.
 

जेवणावळीवरून उडाला होता गोंधळ
रतिलाल जरीवाला हे तुकाराम चव्हाण यांच्या प्रचारासाठी फुलंब्रीला गेले. तेथे पहाडेंचे कार्यकर्तेही पोहोचले. प्रचारानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते थकले. गोविंदभाईंच्या कार्यकर्त्यांसाठी जेेवणाची सोय करण्यात आली होती. पहाडेंचे कार्यकर्ते उपाशी होते. त्यांना कुणी विचारत नसल्याचे पाहून रतिलाल जरीवाला आपल्याच कार्यकर्त्यांवर चिडले. राजकारणात शत्रुत्व फक्त निवडणुकीपुरते असते. भारतीय संस्कृतीत शत्रूलाही जेवू घालण्याची परंपरा आहे. आपण तर सोबत काम केले आहे. आपण मित्रच आहोत. त्यांचीही जेवणाची सोय करा, असे फर्मान त्यांनी सोडले आणि नंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोबत जेवण केले.
 

गोविंदभाईंना कौल नाही
पहिल्या निवडणुकीत गोविंदभाईंसह त्यांच्या आघाडीतील २७ उमेदवारांना जनतेने नाकारले. निम्म्याहून अधिकची अनामतही जप्त झाली. हैदराबाद स्टेट असेंब्लीचे पहिले लोकनियुक्त आमदार म्हणून माणिकचंद पहाडे १८९ मतांनी निवडून आले. ३ एप्रिल १९५२ मध्ये कमिटी ऑफ प्रिव्हिलेजसाठी १० नावे जाहीर करण्यात आली. यात पहाडे यांना स्थान मिळाले. ७ जुलै १९५५ रोजी त्यांचे नांदगाव येथे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...