आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World Epidemic Of Corona; 11 Patients In The Maharashtra, One Suspect In Aurangabad

कोरोना जागतिक महामारी; राज्यात ११ रुग्ण, औरंगाबादेत एक संशयित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डीत साईदरबारी भाविकांची स्क्रीनिंग केली जात आहे. - Divya Marathi
शिर्डीत साईदरबारी भाविकांची स्क्रीनिंग केली जात आहे.
  • भारतात सर्व देशांच्या नागरिकांना येण्यास १५ एप्रिलपर्यंत बंदी
  • आणखी १८ रुग्ण, आकडा ६८ वर, कर्नाटकात संशयिताचा मृत्यू
  • एकट्या पुण्यातच ८, मुंबईत २ रुग्ण; राज्यात ३१२ जणांचे नमुने निगेटिव्ह

नवी दिल्ली/ जिनेव्हा - जगातील ११० देशांत ४३०० वर बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वैश्विक महामारी घोषित केले. आजवर १.१८ लाख लोकांना याची बाधा झाली आहे. ही घोषणा करताना संघटनेचे सरचिटणीस डॉ. टेड्रोस अदनोम ग्रेब्रेयासस म्हणाले, हा साथरोग जगभर पसरण्याची भीती कायम आहे. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ६८ वर गेली. केंद्राने परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर १५ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. भारतीय बाहेर देशात गेला तरी तो परतल्यावर त्याला १४ दिवस निगराणीखाली ठेवले जाईल. इकडे कर्नाटकातील एका संशयित रुग्णाचा हैदराबादत मृत्यू झाला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तो देशात पहिला बळी ठरेल. 



पॅनडेमिक म्हणजे महामारी. यात जगभर मोठ्या संख्येने लोकांना बाधा होऊ शकते. २००९ मधील स्वाइन फ्लू हे याचे एक उदाहरण आहे. कोणत्याही नव्या विषाणूची बाधा अधिक घातक असते. कोरोना व्हायरसमध्ये ही सर्व लक्षणे आढळून आली आहेत.



परिणाम : विमा कंपन्या उपचारांचा खर्च करतील?

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे के. सुब्रमण्यम म्हणाले, भारत सरकारने किंवा डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी घोषित केले तरी याचा आरोग्य विम्यात लाभ मिळणार नाही. कारण, असे आजार कव्हर नसतात.

तयारी : जिल्हास्तरावर खाटा सज्ज ठेवा : निर्देश

> आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. सर्व जिल्हा रुग्णालये व मेडिकल कॉलेजमध्ये जास्तीच्या खाटा तयार ठेवण्याच्या सूचना.

> दिल्लीसह सर्व ६ एम्समध्ये प्रत्येकी ३० खाटा राखीव. 

दहशत : अमेरिकी बाजारात ५% घसरण :


> अमेरिकी बाजारात डाऊ जोन्स ५% घसरून १२५० अंकांनी,  तर एस अँड पी ४.३७% कोसळला. युरोपात २% परिणाम झाला. याचा परिणाम गुरुवारी भारतीय बाजारात होऊ शकतो. 

>  जागतिक ट्रॅव्हल असो.ला ६० लाख कोटींचा फटका. चीन वगळता जगभर केवळ ४० हजार रुग्ण. इराण, इटली, अमेरिका अधिक प्रभावित. 
 

एकट्या पुण्यातच ८, मुंबईत २ रुग्ण; राज्यात ३१२ जणांचे नमुने निगेटिव्ह

पुणे/मुंबई - राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा बुधवारी ११ जणांवर गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात ८ रुग्ण आहेत. मुंबईतील दोघांचा, तर नागपुरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुण्यात १८, मुंबईत १५ जण भरती आहेत. ३१२ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले आहे. 



> औरंगाबादेतही कोरोनाचा संशयित १६ वर्षीय रुग्ण आढळला असून घाटीत उपचार सुरू आहेत. नमुन्याचा अहवाल २-३ दिवसांत येईल. मात्र, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी तो न्यूमोनियाग्रस्त असल्याचा दावा केला. हा रुग्ण मूळ यूपीचा असून तो औरंगाबादेतील एका बेकरीत काम करतो.



बीडच्या तिघांवर वॉच

११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर १,१९५ विमानांमधील १ लाख ३८,९६८ प्रवासी तपासले आहेत. बीडच्या तिघांवर वॉच ठेवला जात आहे. दुबईहून परभणीत आलेल्या पाच जणांचे नमुने तपासणीस पाठवले.



रुग्णांच्या ३ किमी परिसरातील सर्वांची तपासणी

मुंबई - उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या व्यक्तींची चाचणी केली जाईल. कोरोनाग्रस्तांच्या घराभोवतालच्या ३ किमी अंतरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल.



आयपीएल संकटात
 
प्रेक्षकांना तिकीट करू नका, तरच आयपीएल सामन्यांना मंजुरी देऊ, अशा निर्णयाप्रत महाराष्ट्र सरकार आले आहे. यामुळे यंदा आयपीएल टीव्ही इव्हेंटपुरतेच राहू शकते. राज्यात ८ सामने होणार आहेत. 



शाळांना सुट्या? : दहावी परीक्षेमुळे २ दिवस थांबू. त्यानंतर गरजेनुसार शाळा-काॅलेजला सुट्या देऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 



अधिवेशन गुंडाळणार : अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारीच गुंडाळले जाऊ शकते. आधी २० मार्चला समारोप होणार होता.