जगातील सर्वात मोठे / जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ए-380 चे उत्पादन होणार बंद; एअर बसने आतापर्यंत विकली केवळ 234 विमाने 

Feb 15,2019 09:36:00 AM IST

टॉलुसी (फ्रान्स)- जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ए-३८० चे उत्पादन आता बंद होणार आहे. युरोपियन कंपनी एअर बस आता केवळ अशी १७ विमाने तयार करणार आहे. यातील १४ एमिरेट्स एअरलाइनसाठी, तर ३ जपानच्या एएनए एअरलाइनसाठी असतील. शेवटच्या विमानाची बांधणी २०२१ मध्ये पूर्ण होईल. एमिरेट्स या विमानांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यांच्याकडे सुमारे ११० ए-३८० विमाने आहेत. कंपनीने ५३ विमानांची ऑर्डर दिलेली होती, मात्र काही दिवसांपूर्वी या ऑर्डरची संख्या कमी करून १४ केली आहे. त्यानंतरच एअर बसने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कँटास एअरलाइन्सनेही ए-३८० ची ऑर्डर रद्द केली होती.

एअर बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम एंडर्स यांनी सांगितले की, हा निर्णय अत्यंत दु:खद आहे. आम्ही यात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, आम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागणार आहे.' उत्पादन बंद झाल्याने एअर बसमधील तीन ते साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. विविध एअरलाइन्स कंपन्यांकडे जोपर्यंत हे विमान राहील, कंपनी तोपर्यंत या विमानाची सर्व्हिसिंग करत राहणार आहे. एमिरेट्सने सांगितले की, ए-३८० विमान २०३० च्या दशकापर्यंत आमच्याकडे राहील.

उत्पादन बंद करण्याची ४ कारणे
- नवीन विमान जास्त सक्षम व स्वस्त आहेत. एमिरेट्सने ए-३८० ची ऑर्डर रद्द करून ए-३५० आणि ए-३३० नियो विमान घेण्याचा निर्णय घेतला. ए-३५० ची किंमत ए-३८० पेक्षा सुमारे ३० टक्के कमी आहे.
- नवीन विमान हलके असते. त्यामुळे कमी इंधन लागते. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चातील ३५ ते ४० टक्के खर्च हा इंधनावरच होत असतो.
- ए-३८० केवळ मोठ्या विमानतळावर उतरू शकते. सर्व सीट भरलेले असतील तरच फायदा होतो. छोटे विमान कोठेही उतरू शकते.
- ए-३८० ने २००७ मध्ये पहिल्यांदा उड्डाण घेतले होते. त्यानंतरच जगभरात आर्थिक मंदी आली होती. त्यामुळे याची विक्री कमी झाली.

पंख इतके मोठे की त्यावर ७० कार उभ्या राहतील
ए-३८० चे उत्पादन २००५ मध्ये सुरू झाले आणि २००७ मध्ये पहिले विमान झेपावले. याचे डॅने (पंख) इतके मोठे आहेत की, त्यावर ७० कार उभ्या करता येतील. त्या काळी ४ इंजिने असलेल्या या विमानाचे खूपच कौतुक झाले होते. यामुळे विमानतळावरील विमानांची गर्दी कमी होईल, असे मानले जात होते. यामुळे खर्च कमी होऊन नफा वाढेल, असे विमान कंपन्यांना वाटले होते. एअर बसने अशी १,२०० विमाने विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आतापर्यंत केवळ २३४ विमानांची विक्री झाली. आणखी १७ विमाने विक्री होणार असल्याने एकूण २५१ ए-३८० बनतील. ज्या विमानतळावर या विमानाची सेवा सुरू होणार होती त्या विमानतळांनाही काही बदल करावे लागले होते.

युरोपच्या आर्थिक शक्तीचे प्रतीक, आता ब्रेक्झिटचे
एकेकाळी युरोपमधील एकच चलन युरोप्रमाणे ए-३८० लाही युरोपियन युनियनचे प्रतीक म्हटले जात होते. विमानाचे वेगवेगळे भाग ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्ये तयार होतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी याला युरोपातील आर्थिक शक्तीचे प्रतीक असल्याचे म्हटले होते. आता याचे उत्पादन बंद होणेही युरोझोन विस्कळीत होत (ब्रेक्झिट) असल्याचे प्रतीक मानले जात आहे.

X