आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत तयार होतात १० कोटी दिवे, संबंधित कुटुंबांचा वार्षिक व्यवसाय एक हजार कोटी रुपयांचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुदकुमार दास

मुंबई - १९३२ मध्ये गुजरातमधून विस्थापित होऊन आलेल्या कुंभार कुटुंबांनी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या कुंभारवाड्याचे रूपांतर सर्वात मोठ्या दिवे बाजारात केले आहे. १२.५ एकरातील या भागात एक हजार कुटुंबे मातीचे दिवे, भांडे, सजावटीच्या इतर वस्तू तयार करतात. सध्या येथे दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापारी गोवा, सोलापूर, नागपूर, नाशिक, सुरत बडोद्याहून येत आहेत. वर्षभरात येथे सुमारे १० कोटी दिवे बनवले जातात. त्यामुळे कुंभारवाड्याला ‘पॉटरी व्हिलेज’ हे नवे नावही मिळाले आहे. कुंभारवाड्यातील सर्वात मोठे दिवे व्यापारी नरोत्तम टांक म्हणाले की, ‘आम्ही येथे बनवलेले डिझाइनर दिवे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि आखाती देशांत पाठवतो. त्यांची ऑनलाइन विक्रीही होत आहे.’ एवढेच नाही तर शाळा-कॉलेजचे विद्यार्थीही या कारागिरांकडून कौशल्य शिकण्यासाठी येत आहेत. असे प्रशिक्षण वर्ग चालवणारे युसूफ गलवानी सांगतात की, आर्किटेक्ट, इंटीरिअर डेकोरेटर, पॉटरी आर्टिस्ट काम शिकण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही सहा महिन्यांचे वर्ग घेतो. त्याचे शुल्क दरमहा ७००० रु. आहे. धारावी प्रजापती सहकारी उत्पादक संघाचे उपाध्यक्ष देवजी चित्रोदा यांना कुंभारवाड्याचे सध्या परिवर्तन होत असल्याचे वाटते. ते सांगतात की, ‘पर्यावरण लक्षात घेऊन येथे जैव इंधनावर चालणाऱ्या विना धुराच्या भट्ट्या लावल्या जात आहेत. ७ भट्ट्या लागलेल्या आहेत. पुरुष सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाके फिरवतात आणि महिला मातीचे गोळे बनवणे आणि दिव्यांची सजावट करून त्यांना मदत करतात. रोज एक कुटुंब २ ते ५ हजार दिवे तयार करते. शाळा-कॉलेजांतून येऊन मुलेही मदत करतात. भट्ट्यांची देखरेख, दिवे आणि  भांड्यांना गेरूने रंगवणे, चित्रकारीचे काम नवी पिढी करते. वेशावर फाउंडेशन येथील डिझाइनर दिवे मोठ्या कंपन्यांपर्यंत पोहोचवतेे.
 

मातीची कला प्रत्येक कुटुंब एक वर्षात तयार करते १ लाख दिवे
धारावी प्रजापती सहकारी उत्पादक संघाचे अध्यक्ष कमलेश चित्रोदा यांनी सांगितले की, येथे प्रत्येक कुंभार कुटुंब वर्षभरात १ लाख दिवे तयार करते. त्यातून महिन्याला १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न होते. दरवर्षी येथून ८ ते १० कोटी दिवे विकले जातात. सुमारे ५० लाख दिवे विदेशात जातात. येथे दिवे, पॉटरी आणि इतर सजावटीच्या साहित्याचा वार्षिक व्यवसाय १००० कोटी रु. चा आहे.