आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांच्या पत्नीला घटस्फोटानंतर मिळू शकतील 4.82 लाख कोटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस (५५) यांनी पत्नी मॅकेंझीला (४८) बुधवारी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. संपत्तीची विभागणी झाल्यास मॅकेंझी जगातील सर्वात श्रीमंत महिला बनू शकतात, तर जेफ बेजोस सर्वात श्रीमंत व्यक्तीचे किताब गमावू शकतात. वॉशिंग्टनमधील कायद्याचा विचार करता लग्नानंतर मिळवलेल्या संपत्तीची वाटणी घटस्फोटानंतर पती-पत्नीत सम प्रमाणात होते. 

 

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती ९.६४ लाख कोटी (१३ हजार ७०० कोटी डॉलर) आहे. कायद्याने मॅकेंझी यांना ४.८२ लाख कोटी रुपये (६,८५० कोटी डॉलर) मिळू शकतात. ही संपत्ती मॅकेंझी यांच्या नावे झाली तर त्या जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या फ्रान्समधील फ्रेंकोइस बेट्टेंकोर्ट मियर्स यांना पछाडत पहिल्या स्थानी पोहोचतील. याआधी १९९९ मध्ये माध्यम सम्राट रुपर्ड मर्डोक यांची पत्नी अॅन्ना तोर्वला घटस्फोट दिल्यानंतर पत्नीला ८ हजार ६७० कोटी रुपये देण्यात आले होते. ती सर्वाधिक रक्कम हाेती. परंतु बेजोस दांपत्यामध्ये लग्नाआधी काही करार झाला होता की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. परंतु मॅकेंझी या पतीच्या संपत्तीत वाटा मागणार नाहीत, असा अंदाजही तज्ज्ञांकडून लावला जात आहे. कारण घटस्फोटानंतर दोघेही जण कुटुंब आणि मित्राप्रमाणे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 

१९९३ मध्ये जेफ आणि मॅकेेंझी यांचा विवाह झाला होता. त्यावेळी दोघेही हेज फंड कंपनी डी ई शॉ मध्ये सहकारी म्हणून काम करायचे. १९९४ मध्ये जेफ यांनी अॅमेझॉनची सुरुवात केली. गॅरेजमधून सुरू झालेली अॅमेझॉन आज जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप ५७ लाख कोटी रुपये आहे. जेफ यांच्याकडे अॅमेझॉनचे ८ कोटी शेअर्स आहेत. मॅकेंझी यांच्या नावावर किती काेटीचे शेअर्स अाहेत, त्याची माहिती मिळू शकली नाही. 

 

जगातील सर्वात श्रीमंत ३ महिलांना वारसाहक्काची संपत्ती 
बेजोस यांच्या संपत्तीची विभागणी कोर्टात होईल की सहमतीने यावर निर्णय झालेला नाही. परंतु ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत ३ महिलांना वारसा हक्काने संपत्ती मिळाली आहे. यात फ्रान्समधील फ्रेंकोइस मियर्स पहिल्या आहेत. लॉ रियल कंपनीच्या संचालिका मियर्स यांची एकूण संपत्ती ३.२७ लाख कोटी आहे. दुसऱ्या स्थानी अमेरिकेतील एलाइस वॉल्टन आहेत. वॉलमार्टच्या संचालिका एलाइस यांची एकूण संपत्ती ३.२२ लाख कोटी रुपये आहे, तर तिसऱ्या स्थानी जर्मनीतील सुसेन क्लेटन आहेत. बीएमडब्ल्यूच्या सुसेन यांची एकूण संपत्ती १.७५ लाख कोटी आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...