आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूक्ष्म सिंचनातून बदलतेय शेतीचे अर्थकारण; ऑस्ट्रेलियात एमबीए केलेला तरुण पुण्यातील नोकरी नाकारून करतोय शेती, वर्षाला 40 लाखांचे उत्पन्न 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सूक्ष्म सिंचनाचा वापर करून फायद्याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ऊस, कापूस या पारंपरिक पिकांऐवजी आता शेवगा, हळद, पेरू, मोसंबी लागवड करून गेवराईच्या अगरनांदूर गावातील श्रेयस अट्टल या तिशीतील तरुणाने आधुनिक शेती सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियातून एमबीए केल्यानंतर पुण्यात नोकरीच्या अनेक उत्तम संधी असूनही त्याने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला हे विशेष. 

 

हवामानातील बदल, अपुरा पाऊस ही शेतीसमोरील आव्हाने आहेत. मात्र, योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती फायद्याची ठरत असल्याचे वाल्मी येथे आयोजित सूक्ष्म सिंचन परिषदेत आलेल्या शेतकऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. सोमवारी परिषदेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शेतीत वेगवेगळे प्रयोग केलेले हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, गुजरात आदी राज्यांतील १५० शेतकरी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 

 

उसाचे उत्पादन एकरी २७ वरून ७० टनांवर 
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कारभारवाडी १०० टक्के सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. याविषयी शिवरामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी सांगितले की, सतत उसाचे पीक घेतल्याने जमिनीचा पोत बिघडला. त्यामुळे एकरी २७ टन इतकेच उत्पन्न मिळत होते. त्यामुळे शेती परवडत नव्हती. मात्र, सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून गावात शंभर टक्के ठिबकचा वापर केला. आता उत्पादन ७० टनांवर गेले आहे. उसात भाजीपाला लावला आहे. त्यामुळे पूर्वी १५ हजार एकरी मिळणारे उत्पन्न आता एक लाखावर गेले आहे. 

 

दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे 
श्रेयस अट्टल याची ३२ एकर शेती आहे. पैकी १६ एकरांत सिंचन केले आहे. श्रेयस म्हणाला, मी ऊस आणि कापसाचे पीक घेत नाही. हळद, शेवगा, पेरू, मोसंबी ही पिके घेतली आहेत. शेतात २ कोटी लिटर क्षमतेचे शेततळेदेखील घेतले आहे. या वर्षी मला ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेती फायद्याची वाटत असल्यामुळे मी नाेकरी नाकारली. याचा मला फायदाच झाला आहे.
 
शेतमाल करतो स्वित्झर्लंडला निर्यात 
धुळ्याचे प्रकाश पाटील म्हणाले, मी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. आता पूर्णवेळ शेती करताे. माझी ३७ एकर शेती आहे. विहीर आहे, पण त्यात पाणी नाही. तापी नदीवरून सहा किमी अंतराची पाइपलाइन करून सव्वा काेटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. केळी, पपई, कापूस ही पिके घेतो. आम्हीच स्थापन केलेल्या कंपनीमार्फत शेतमाल स्वित्झर्लंडला निर्यात करतो. वर्षाला ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी आता नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

 

बातम्या आणखी आहेत...