आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय अनुभव असणाऱ्यांसमोर यंग ब्रिगेडने उभे केले कडवे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १५मध्ये राजकारणाचा अनुभव असलेल्या उमेदवारांच्या विरोधात उच्चशिक्षित, तरुण उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागातून १८ उमेदवार नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहेत. तरुण उमेदवारांनी मातब्बर उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले असल्याने या लढतीत कोण बाजी मारतो याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

प्रभाग क्रमांक १५मध्ये साक्री रोडवरील भीमनगर ते फाशीपूल या परिसराचा समावेश होतो. प्रभागात सुमारे १५ हजार ४२९ मतदार असून, १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बहुतांश मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. असे असले तरी प्रभागातून उमेदवारी करणारे काही चेहरे तरुण व उच्चशिक्षित आहेत. त्यात लोकसंग्रामचे राहुल वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम शिरसाठ, जितेंद्र घाेरपडे, सचिन आखाडे, अपक्ष उमेदवार राजरत्न बैसाणे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

 

प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसने तीन नव्या चेहऱ्यांसह निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. लोकसंग्रामनेही हाच कित्ता गिरवला आहे. प्रभागातील १८ उमेदवारांमध्ये राजकीय अनुभव असलेले भाजपचे संजय जाधव, विद्यमान नगरसेविका व बसपाच्या उमेदवार सुशीला ईशी रिंगणात आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत श्रीखंडे यांनी पत्नी संगीता श्रीखंडे यांना तर राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी मुलगी पूनम शिरसाठ यांना राजकीय वारस म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजकीय अनुभव व आजवर केेलेल्या विकास कामांचा त्यांना लाभ होऊ शकतो. भारिप बहुजन महासंघाचे सिद्धार्थ पारेराव व बसपाचे योगेश ईशी यांचेही प्रभागात प्रस्थ आहे. लोकसंग्रामने प्रा. वैशाली जवराळ व विद्यापीठात सिनेट सदस्य योगेश मुकुंदे यांना संधी दिली. जितेंद्र घोरपडे गेल्या निवडणुकीतही रिंगणात होते. त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. 


१८ उमेदवार निवडणूक रिंगणात 
प्रभागातील अ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम जितेंद्र शिरसाठ, भाजपच्या सोनिया राजेश ओहाळ, लोकसंग्रामच्या प्रा. वैशाली विजयकुमार जवराळ, बहुजन समाज पार्टीच्या सुशीला यशवंत ईशी, अपक्ष रंजना रमेश इंगळे, ब जागेवर मंगला सुरेश पाटील, अपक्ष अश्विनी दादाजी पाटील, राष्ट्रवादीच्या संगीता प्रशांत श्रीखंडे, बहुजन समाज पार्टीच्या शैला माणिक पुकळे, लोकसंग्रामच्या शीतल संदेश भोपे, क जागेवर भाजपचे संजय सुधाकर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र विनायक घोरपडे, लोकसंग्रामचे राहुल रमेश वाघ, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र विष्णू इंगळे, ड जागेवर भारिप बहुजन महासंघाचे सिद्धार्थ संतोष पारेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन नानाभाऊ आखाडे,भाजपचे बन्सीलाल माणिक जाधव, अपक्ष राजरत्न मिलिंद बैसाणे, बहुजन समाज पार्टीचे प्रकाश दिलीप शिंदे, लोकसंग्रामचे योगेश दत्तात्रय मुकुंदे रिंगणात आहेत. तरुण, शिक्षित, व गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांना संधी देण्यात आली आहे. 

 

प्रभागातील समस्या 
प्रभागात अनेक समस्या आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही. त्याचबरोबर प्रभागातील अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक भागात गटारी नाहीत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ही कामे तातडीने होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे. प्रभागातील नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. 

 

विकास कामे 
प्रभागातील शंभर फुटी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. सिंहस्थ नगर परिसरात रस्त्याचे काम झाले आहे. या प्रभागातील भीमनगर परिसरात घरकुल योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर डी.पी. रस्ता, एलईडी दिवे बसवण्यात आले आहे. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची सोय झाली आहे. 
संजय जाधव   

बातम्या आणखी आहेत...