आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोवळ आलेली नाट्यगृहे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आता वेगळे राहिलेले नाहीत. सकाळी शूट, तर संध्याकाळी प्रयोग, पुन्हा रात्री शूट अशा दोन-दोन-तीन-तीन शिफ्टमध्ये कलाकार काम करत असतात. प्रॉडक्शन हाऊसची इकॉनॉमी, चॅनलची स्पर्धा, मालिकेचा टीआरपी आणि त्याच वेळी नाटकांची संधी या सगळ्या खेळात जगण्याचं म्हणण्यापेक्षा आरोग्याचंच  नाटक होत आहे.


नाट्यक्षेत्र वर्तुळाच्या पाचवीला पुजलेली नाट्यगृहांची दुरवस्था आता कलाकारांच्या जिवावर उठते याची उदारहणं कमी नाहीत. गेल्याच आठवड्यात सांगलीत अभिनेता वैभव मांगले यांना भर प्रयोगादरम्यान भोवळ आली आणि पुन्हा एकदा कलाकारांच्या "हेक्टिक शेड्यूल'सह नाट्यगृहांची दुरवस्था, तिथे उपलब्ध नसलेल्या सोयी-सुविधाही चर्चेत आल्या. राज्यातील अनेक नाट्यगृहेच भोवळ येऊन पडलेल्या अवस्थेत असल्याचे आता नवीन नाही. या संदर्भात शासनाच्या अर्थसंकल्पात तरतूद असूनही केवळ अनास्थेपायी कलाकारांचे मात्र हाल होतात अन्् त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गेल्या २६ तारखेला, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रयोगादरम्यान वैभव मांगले यांना डिहायड्रेशनमुळे चक्कर आली. याच आठवड्यात संपूर्ण राज्य उन्हामुळे तापले होते. प्रचंड उन्हाळा, शिवाय नाट्यगृहात एसीही नसल्याने वैभव मांगलेंना त्रास झाला. सुदैवाने त्यांच्यावर तत्काळ उपचार झाले आणि मग रात्रीचा प्रयोग रद्द करण्यात आला. दोन-अडीच वर्षांपूर्वी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यादेखील भर कार्यक्रमात रंगमंचावरच कोसळल्या होत्या आणि हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. विठ्ठल उमप यांनीही अशीच हृदयविकाराने रंगमंचावरच एक्झिट घेतली. मच्छिंद्र कांबळी, रिमा लागू यांनाही हृदयविकाराने रंगमंचाची सेवा सोडावी लागली. अशी अनेक उदाहरणे आहेत. 


नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आता वेगळे राहिलेले नाहीत. सकाळी शूट, तर संध्याकाळी प्रयोग, पुन्हा रात्री शूट अशा दोन-दोन-तीन-तीन शिफ्टमध्ये कलाकार काम करत असतात. प्रॉडक्शन हाऊसची इकॉनॉमी, चॅनलची स्पर्धा, मालिकेचा टीआरपी आणि त्याच वेळी नाटकांची संधी या सगळ्या खेळात जगण्याचं म्हणण्यापेक्षा आरोग्याचंच  नाटक होत आहे. मुळातच मराठी कलाकार हा नाटकवाला आहे. मराठी माणसाला चित्रपट, मालिकांपेक्षा नाटक अधिक जवळचे आहे. त्याची कारणं वेगवेगळी असतील. पण, उत्तम संहिता मिळाली, चांगली भूमिका मिळाली की, ते नाटक आपण केलंच पाहिजे... हवं तर त्यासाठी वेळा अॅडजस्ट करून घेतल्या जाऊ शकतील, अशी साधारणपणे कलाकारांची सवय असते. पण, ही अॅडजस्टमेंटच इतकी धावपळीची असते की त्यानंतर नाट्यगृहात पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, ड्रेपरी, मेकअप, चाहत्यांना भेटणं या सगळ्यात पुन्हा नाटकासाठी एनर्जी कायम ठेवणं आणि त्यातही काही भूमिका या थकवणाऱ्या असतात हे सगळं अत्यंत "हेक्टिक' होत जातं आणि पर्यायाने त्याचा परिणाम आरोग्यावर होत राहतो. 


आता म्हणाल की, मग एवढी धावपळ कशाला करायची? जे दोन पैसे मिळतात ते सुखाने घ्यावेत, पण तसं नसतं. प्रत्येक मालिकेचं वा नाटकाचंही आयुष्य ठरलेलं असतं. अनेक नाटकं चांगली असतात. पण, ती त्या काळात चालत नाहीत. म्हणजे ती वेळ त्या नाटकाची वा मालिकेची नसते. त्यातही मालिकेचं असं असतं की, टीआरपी चांगला मिळतोय ना? मग मारुतीच्या शेपटीसारखी वाढू द्या मालिका... नाटकाचं तसं असतं का? मुळीच नाही. त्यामुळेच मग त्या नाटकांसाठी कलाकार आणि निर्मातेही त्या काळाचा विचार करूनच नाटक रंगमंचावर आणत असतात. त्याचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असतो. मुद्दा असा आहे की, नाटक ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती मराठी माणसाच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच तर तीला राजाश्रय मिळाला आहे. पण, आपल्या उदासिन राजाश्रयाचा फटका आता कलाकारांना बसू लागला आहे. 


नाशिकच्या कालिदास कलामंदिराची दूरवस्था माध्यमांनी अधोरेखित केली. प्रशांत दामले, मोहन जोशी यांनीही या नाट्यगृहाच्या दूरवस्थेबद्दल सोशल मीडिया आणि निवेदने देत तक्रार केल्यानंतर आता सुसज्ज असे नाट्यगृह उभे आहे. किरकोळ बाबींची समस्या आजही असली तरी नाट्यगृहाच्या या समस्येवर हा संघर्ष दोन-अडीच वर्ष सुरू होता. आैरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यमंदिराचीही तीच दशा. कलाकारांनी, माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच प्रशासनाला जाग का येते आणि मग ते काम का हाती घेतात हा खरं तर प्रश्न आहे. कल्याणचे अत्रे रंगमंदिरही याच पंक्तीत येऊन बसते. आता या नाट्यगृहांचे नूतनीकरण होत असले तरी त्यांच्या मेंटेनन्सचं आणि मुख्य म्हणजे कलाकारांना मिळणाऱ्या सोय-सुविधांचं काय? भोवळ आलेल्या या नाट्यगृहांकडे कोणी बघणार आहे की नाही? मोठ्या शहरांमध्ये ही अवस्था तर सांगली, कोल्हापूर, सातारा किंवा जळगाव, धुळे, मराठवाड्यातील गावे या ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी. या ठिकाणी मोठं नाटक कधी तरी होत असतं, त्या नाटकाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद असतो. पण, नाट्यगृहांत सुविधांची वानवा. मंचावर लागणाऱ्या गोष्टींची एक वेळ सोय होऊ शकते पण, कलाकारांसाठीच्या किमान गरजाही अनेक नाट्यगृहे पूर्ण करत नाहीत. ग्रीन रुममध्ये पंखे असतात तर तेही बंद, टॉयलेट-बाथरूमची दारंच तुटलेली, एसी एक तर बंद असतो िकंवा त्याचा स्पीड फिक्स करून कर्मचारी गायब असतो. प्यायला पाणी नाही, जेवायला जागा नाही... अशा एक ना अनेक समस्यांना सामोर जात कलाकार आपली कला सादर करून पुढच्या प्रयोगाला निघतात. त्या-त्यावेळी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं, आपल्या भाषेत वेळ मारून नेली जाते पण, त्याचाच त्रास पुढे होऊ लागतो. टॉयलेट-बाथरुमला दारच नसेल वा नेमक्या ठिकाणीच ते तुटलेले असेल तर जाणार कसे? मग काय? स्वत:वर नियंत्रण ठेवा. याच नियंत्रणात शरीरावर जो परिणाम होतो त्याची जबाबदारी कोणाची? त्या-त्या वेळी अशा बारीक-सारीक गोष्टींचा विचार जर कलाकारांनी केला तर मग  त्या नाट्यगृहांमध्ये वा गावांमध्ये नाटकंच होणार नाहीत. त्यामुळे अज्ञातात सुख म्हणत कलाकारही पुढे जातात. पण, जाता-जाता भविष्यातील दुखण्यांना निमंत्रण मात्र देऊन त्यांना जावं लागतं. 


अत्यंत साध्या मागण्या आहेत, प्यायला पाणी, मोकळी हवा (म्हणजे खिडक्या नव्हे, तर एसी किंवा मुबलक प्रमाणात सुरू असणारे पंखे) जेवायला जागा, विश्रांती घ्यायला एखादी रूम, स्वच्छ टॉयलेट-बाथरूम. कलाकारांना या साध्या सुविधाच हव्या असतात. (तांत्रिक बाबी मांडल्या तर नाट्यगृहं बंद पडतील) पण, शासनाच्या अनास्थेमुळे, असुविधेमुळे आता कलाकारांच्या जिवावर मात्र बेतायला लागलं आहे. सांगलीच्या नाट्यगृहात जर वातानुकूलित यंत्रणा असती, वैभवला थोडी विश्रांती मिळाली असती तर आज पुन्हा ही भोवळ आलेली नाट्यगृहे चर्चेचा विषय झाली नसती.

लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९
 

बातम्या आणखी आहेत...