Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | theft arrested by solapur rural police

रेल्वेतून उडी मारून पळून गेलेला चोरटा ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 05:34 AM IST

मंद्रूप परिसरात कारवाई, विविध ठाण्यांत दहा गुन्हे, तीन गुन्ह्यांमध्ये हवा होता

 • theft arrested by solapur rural police

  सोलापूर - दहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी तपास कामासाठी विजापूर-सोलापूर रेल्वेने एका अट्टल चोरट्यास नेले होते. तडवळ रेल्वे स्टेशनजवळ पोलिसांना धक्का मारून तो पळून गेला होता. स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मंद्रूप परिसरातील आैराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील संजवाड चौकात त्यास पकडले. प्रीतिज्ञान उर्फ गुल्या जिजिंग्या पवार (वय ३०, रा. केगाव, ता. अक्कलकोट) असे त्या चोरट्याचे नाव आहे. त्यावर दहा गुन्हे दाखल असून, तीन गुन्ह्यांमध्ये हवा होता.

  पवार हा जबरी चोरी, दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो मंगळवारी (दि.२१) आैराद शिवारात असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यास सापळा रचून अटक केली. पोलिसांना पाहताच त्याच्या कमरेला असलेला धारदार सुऱ्याने त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिस नाईक लालसिंग राठोड, हवालदार विजयकुमार भरले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही इतर पथकाने धाडसाने त्यास ताब्यात घेतले.

  पवार यास तडीपार करण्यात आले होते. तरीही तो जिल्ह्यात फिरत होता. पोलिसांवर हल्ला, चोरीच्या गुन्ह्यात त्या विरुद्ध मंद्रूप पोलिसात तक्रार देण्यात आली. तपासाकरिता त्यास अक्कलकोट साऊथ पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. सराईत गुन्हेगार गुल्या पवार याच्यावर मंद्रूप, कामती, सोलापूर तालुका, इंडी, चडचण (कर्नाटक), अक्कलकोट साऊथ या पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. सोलापूर लोहमार्ग, मंद्रूप व अक्कलकोट साऊथ पोलिसांना तो काही गुन्ह्यांतील चौकशीसाठी हवा होता.

  नोव्हेंबर महिन्यात पळाला होता..
  शहर पोलिसांनी पवार यास तपासासाठी विजापूर न्यायालयात नेले होते. विजापूर-मुंबई या रेल्वेगाडीने सोलापूरकडे येत असताना तडवळ रेल्वे स्टेशन येथे गाडी आल्यावर नैसर्गिक विधीचा बहाणा करीत पोलिसांना धक्काबुक्की करीत त्याने धावत्या रेल्वेतून उडी मारली. तेव्हापासून तो गायब होता. मंगळवारच्या कारवाईत पवार याच्याकडून मोटारसायकल, मोबाइल, सुरा जप्त करण्यात आला. ही कारवाई, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, फौजदार विक्रांत हिंगे यांच्यासह विजयकुमार भरले, लालसिंग राठोड, रवी माने, सचिन गायकवाड, अजय वाघमारे, इस्माईल शेख, अनंत चमके यांच्या पथकाने केली.

Trending