आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या नवीन पोलिस अधीक्षकांना चोरट्याची सलामी; परतवाडा शहरात पाच दुकाने फोडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाड्यातील गुजरी बाजारातील दुकानांचे असे शटर तोडण्यात आले - Divya Marathi
परतवाड्यातील गुजरी बाजारातील दुकानांचे असे शटर तोडण्यात आले

परतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी दिल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू आहे. 

 

मागील दोन वर्षांपासून शहरासह तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या, घटना नित्याच्या झाल्या आहेत. परंतु अद्यापही या घटनांना आळा घालणे पोलिसांना शक्य होऊ शकले नाही. दरोड्याच्या घटनेची शाई वाळत नाही, तोच चोरट्यांनी मुख्य बाजारातील पाच दुकाने फोडल्याने शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून नागरिक, व्यावसायिकांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात मागील तीन ते चार महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेच्या सुमारास गुजरी बाजारात चोरट्यांनी किराणा, बिअरशॉपी, कपडा शोरूम आदी पाच दुकानांमध्ये हात साफ करून नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना सलामी दिली आहे. 

 

शहरात सर्वाधिक व्यावसायिक प्रतिष्ठाने गुजरीबाजार येथे आहे. चोरट्यांनी या भागातील गोलू नवल तिवारी यांच्या सिद्धसाई किराणा दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ८ ते ९ हजार लंपास केले. प्रकाश चंदनानी यांच्या राम किराणा स्टोअर्स सुपर शॉपीतून ४० ते ५० हजार रोख १ ते सव्वा लाखाचा किराणा लंपास केला. प्रकाश अग्रवाल यांच्या आयुष प्रोव्हीजनमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला असता चोरटे अयशस्वी ठरले. अमरदीप शोरूममधून चोरट्यांनी साड्या, कपडे व रोख असा एकूण ६० ते ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अंजनगाव स्टॉपवरील महाराजा बिअर शॉपीमधून चोरट्यांनी महागड्या सिगारेटचे बॉक्स व गल्ल्यातील रोख १५ हजार, बिअरच्या बाटल्या लंपास केल्याची माहिती आनंद जयस्वाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली. एकाच रात्री पाच चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यावसायिक जगत हादरले आहे. पाचही व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचे गुन्हे दाखल केले. 

 

गुजरी चोरट्यांचे टार्गेट 
शहरातील गुजरी बाजारातील दुकाने नेहमी चोरटे टार्गेट करतात. यापूर्वी गुजरी बाजारातील अनेक प्रतिष्ठानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून, यातील काही चोऱ्यांचा अद्यापही सुगावा लागला नाही. विवेक अग्रवाल यांच्या दरोड्यानंतर काही दुकानातील चोरटे पोलिसांनी निष्पन्न केले होते. मागील काही चोऱ्यांमुळे व्यावसायिक दहशतीत आहेत. 

 

चोरटे सराईत गुन्हेगार 
गुजरीत चोरी करणाऱ्या चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. या चोरट्यांनी बिअरबार, कपड्याचे शोरूम, किराणा दुकानात चोरी करून बियर, किराणा व नगदी २ ते ३ लाख रुपये लंपास केल्याचा अंदाज आहे. चोरीच्या पद्धतीवरून हे चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 


चोरटे ताब्यात घेऊ 
शहरात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास झालेल्या चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, लवकरच त्याला ताब्यात घेऊन तपासाला गती दिली जाईल. याकरिता पोलिसांचे तीन पथक तैनात करण्यात आले असून, विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. राजेंद्र पाटील, ठाणेदार, परतवाडा. 
 

बातम्या आणखी आहेत...