आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणेतीन लाखांची साेन्याची लगड घेऊन बंगाली कारागीर झाला फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भवानीपेठेतील व्यापाऱ्याकडे तीन महिन्यांपासून कामाला आलेल्या बंगाली कारागिराने दागिने घडवण्यासाठी दिलेल्या पावणेतीन लाख रुपये किमतीची सोन्याची लगड लांबवल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजता घडली. हा कारागीर पहाटे दुकानातून बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. या प्रकारामुळे सुवर्ण बाजारात खळबळ उडाली आहे. 


अश्विन सज्जनराज सोनी (रा. लोकमान्य हौसिंग सोसायटी, रिंगराेड) यांचा भवानीपेठेतील ७ खोल्या गल्लीत सोन्याचे दागिने घडवण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे साहेब स्वपन अरी (वय २१, रा.महाराजपूर, थाना घाटाल, जिल्हा पश्चिम सिदनापूर, कलकत्ता) हा तीन महिन्यांपूर्वी कारागीर म्हणून कामाला आला होता. सोनी यांनी त्याच्याकडे २ लाख ७५ हजार रुपये किमतीची (९५.८०० ग्रॅम वजनाची) २२ कॅरेट सोन्याची लगड दागिने घडवण्यासाठी दिली होती. ही लगड घेऊन तो गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत काम करीत होता. दरम्यान, पहाटे ३.३० वाजता तो दुकानातून बाहेर पडताना दिसतो आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता साहेब अरी हा कामावर आला नाही. तसेच त्याचा मोबाइलदेखील बंद होता. त्यामुळे दुसरा कारागीर दिलीप याने सोनी यांना फोन करून कळवले. सोनी यांनी दुकानात येऊन चौकशी केली. अरी याला दिलेली सोन्याची लगड ड्राॅवरमध्ये असल्याची खात्री केली असता दिसून आली नाही. त्यानंतर सोनी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात अरी हा पहाटे दुकानातून बाहेर पडताना दिसून आला. त्याने सोन्याची लगड लंपास करून पोबारा केल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यानुसार सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुद्ध शनिपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सुवर्ण बाजारात भीतीचे वातावरण 
जळगावच्या सुवर्ण बाजारात शेकडो बंगाली कारागीर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. आधी अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार घडले नव्हते; परंतु गेल्या वर्षभरात कारागिराने सोन्याची लगड लंपास केल्याची ही तिसरी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सुवर्ण बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. या तिन्ही घटनांमध्ये नवीन कारागिरांनीच हातसफाई केल्याचे समोर आले आहे. सोनी यांच्याकडे हातसफाई करणारा कारागीर अरी हा देखील तीन महिन्यांपूर्वीच जळगावात आला होता. त्याचे वय देखील कमी आहे. त्यामुळे नव्याने कामास येणाऱ्या कारागिरांसंदर्भात आता व्यापारीदेखील सावध भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहेत. 


सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, सुरेश सपकाळे, शिंदे, दिनेशसिंग पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. सोनी यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजदेखील दिले आहे. यावरुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...