आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातून 119 वकील, 103 डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : जनतेची वकिली केल्यामुळे विलासराव देशमुखांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यत अनेकांनी कोर्ट रूम ते मंत्रालयाचा सहावा मजला अशी मजल मारली. त्यामुळे अाता वकिली पेशातील 'राजकीय' महत्त्वाकांक्षांना घुमारे फुटले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून तब्बल ११९ वकील रिंगणात आहेत. त्या खालोखाल ओपीडीच्या माध्यमातून जनसंपर्क साधणारे डॉक्टर्सही मागे नाहीत. मात्र, दररोज नव मतदारांशी संवाद साधणाऱ्या प्राध्यापकांना मात्र त्यांच्या क्लास रूम्स सोडून विधिमंडळाचे सभागृहाचे आकर्षण दिसत नाही. बिझनेस माईंडेड इंजिनिअर्स आणि जमाखर्चाच्या आकडेमोडीत रमणारे चार्टर्ड अकाउंटं्सचे (सीए) प्रमाण फारच नगण्य आहे.

पहिल्या संसदेत होते सर्वाधिक वकील
स्वातंत्र्य संग्रामातील 'बँरिस्टर्स'च्या नेतृत्वामुळे पहिल्या संसदेत निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य वकिली पेशाचे होते. पुढे बदलत्या काळानुसार लोकप्रतिनिधींचा पेशा संदिग्ध होत गेला. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा, 'शेती' किंवा 'व्यवसाय' हा पेशा दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक असते. शहरी मतदारसंघांची संख्या वाढत गेली तरी शहरी पेशाधारी उमेदवारांची संख्या वाढलेली नाही. अपवाद वकील आणि डॉक्टर्सचा. यंदाच्या निवडणुकीतही वकिली पेशाचे ११९ उमेदवार रिंगणात आहेत. पैठण मतदारसंघातून निवृत्त जिल्हा न्यायाधीश त्र्यंबक जाधव निवडणूक लढवताहेत.

प्राध्यापक मात्र फक्त २२
राजकीय रणधुमाळीत उतरणाऱ्या इंजिनिअर आणि सीए यांच्यासारख्या व्यवसायिकांची संख्या मात्र नगण्य आहे. पूर्ण राज्यात इंजिनिअर्स अवघे ७ आणि एकच सीए निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी सामाजिक-राजकीय क्षेत्रात क्रियाशील मानला गेलेला बौद्धिक वर्ग म्हणजे प्राध्यापक मात्र फक्त २२ आहेत.

'डॉ.' सोबत 'आ.' लावण्यासाठी धडपड
१०३ डॉक्टरांची स्वत:च्या नावामागच्या 'डॉ.' सोबत 'आ.' लावण्यासाठी धडपड सुरू आहे. वकील व डॉक्टर या पेशांसोबत येणारा दांडगा जनसंपर्क आणि आर्थिक सक्षमता यामुळे सर्वच पक्षांच्या 'इलेक्टिव्ह मेरिट' मध्ये यांनी बाजी मारली आहे. सर्वच पक्षांनी महिलांना कमी उमेदवारी दिली असली तरी अपक्ष उमेदवारी करणाऱ्या तसेच इतर पक्षांतर्फे उमेदवारी करणाऱ्या महिलांमध्ये वकील महिलांची संख्या लक्षणीय (१०) आहे.