आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्रिया असतात तुमच्या आसपास

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नारायण भोसले

कसा भवताल उभ्या करतात या भटक्या स्त्रिया? त्यांचा संघर्ष, त्याची धाटणी खरे तर अनन्य आहे. कित्येक पिढ्या मुळापासून उखडल्या तरी त्या पुन्हा पुन्हा उगवून येतच आहेत, जगतच आहेत, जागवतच आहेत, सांगतच आहेत, ऐकणाऱ्याची मात्र तयारी हवी.

आपण जर वेगवेगळ्या अर्थाने जागे असू, आपला भवताल नीट पाहत असू तर आपल्याला अनेक जगाचे किंवा जगाचे अनेक ज्ञान होईल. आपल्याच समाजातील माणसं सतत आपल्या आसपास विविध रुपात वावरत आणि विवंचनेत असलेली दिसतील. त्यांचे जगणे अनन्य आहे... पाहा तुम्हास ती दिसतात का? 

गाव उठण्याच्या आधी तिला नैसर्गिक विधी उरकायचा असतो. सरपटणाऱ्या व अन्य हिंस्र प्राण्यापासून स्वतःला वाचवत त्याला ओळखायचा असतो. पहाट संपताच आकाश फटफटीत होण्यापूर्वी भटक्या स्त्रिया आपला नैसर्गिक विधी उरकत असतात. रिकामा हंडा-घागर घेऊन गाव असो की शहर तिला पाण्याच्या शोधात निघावं लागत. जिथे पाणी मिळण्याची शक्यता असते तिथे उशीर का होईना गावाने पाणी भरल्यावर भटकिणीला पाणी मिळतं. तिला चुलीचे दगडही गोळा करायची मुभा नसते. कष्टाचे जळण गावरंदीतून ती गोळा करते. हगांदारीलाच तिचे पाल असते. स्वच्छ जागेवर कोण तिला राहू देते? घर सोडा पालं देखील नसलेल्या भटक्या स्त्रीला गाव गुंडांच्या नजरा आणि अतिक्रमणाच्या किती प्रसंगात सावध राहावे लागत असेल? मुख्य प्रवाही स्त्री आजही शिकार बनत असताना भटक्या स्त्रीला कोण वाली आहे? 

गावात भिक्षा मागायला गेलेल्या नवऱ्याच्या मिळकतीची वाट पहात आयुष्य कटणाऱ्या भटक्या स्त्रिया असंख्य आहेत. भीक मिळाली... बारा घरच्या बारा प्रकारचं पीठ कूट धान्य पोटाच्या खळगीच्या कोणत्या कोपऱ्यात केलं...? पुढच्या गावाला जाण्याच्या तयारीला भटकी कुटुंबं लागली.... वजाच्ं  गाढव धरून आणलं... आड मेडी पाल काटी मोडली... अंथरूण सार धुळीत भरलं... थानं पितर लेकरू काखेला बांधलं... दुसर लेकरू या गडबडीत गाढवाजवळ जाऊ नये, तान्हं लेकरू पडू नये, गाढव घोड्याची एखादी लाथ बसून आक्रीत घडू नये, अशा वंचनेत असलेली भटकीण आजारी आणि म्हातारी यांना पेज पाजून त्यांना पुढच्या मुक्कामाला तयार करीत असते, भटकी स्त्री दिवसाची स्वप्न पोतडीत भरते. गावाच्या त्रासाला सतत तोंड देते. तिच्या पालाजवळ नैसर्गिक विधी करणाऱ्यांकडे कटाक्ष टाकते. तिचा कटाक्ष आला की गाव ते बंड समजतो. तिचे बंड शमण्याची त्रासाची मालिका गाव सुरू करते. भटकिणीला उठते गाव... भाताकीन व तिचे कुटुंब दयेची भीक मागते, मांजर उंदरावर जितकी दया दाखवते तितकीही दया अपवादाने या भटक्याच्या वाट्याला येते. माणुसकीतून शिकण्याऐवजी कुत्र्याकडून शिकते गाव, आपल्या इलाक्यात दुसऱ्याला शिरकाव करू न देण्याचे! दुसऱ्याचे जीवन कुत्र्यासारखे बनवते हे गाव. अशातही आशावादी बनते भटकी स्त्री. नवी माणुसकी शोधते, अनेक भौगोलिक सीमा ओलांडून कोस दोन कोसावरून पाणी आणते. डोळ्यात साठवते पाणी! गळू वा वाहू देत नाही त्याला आला तरी कसलाही प्रसंग. मोडला तरी काटा पायात धीराने त्याला उठून काढते. डोक्यावर असंख्य स्वप्नांचे ओझे घेऊन वाट चालत राहते. डोंबारीण दोरीवरून चालून कुटुंबाचे भरणपोषण करते. बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोंधळी, गोपाळ, हेळवी, जोशी, मसणजोगी, धनगरीण, वैदीण, मदारी, डवरी गोसावी अशा अनेक स्त्रिया जगत आले आहेत, भवताल बदलत आले आहेत, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या एखाद्या कथा कवितेचा विषय बनतात आणि इथेच विषय संपतो. खरंतर स्टोरी आणखी पुढे आहे. 

कसा भवताल उभ्या करतात या भटक्या स्त्रिया? त्यांचा संघर्ष, त्याची धाटणी खरेतर अनन्य आहे. कित्येक पिढ्या मुळापासून उखडल्या तरी त्या पुन्हा पुन्हा उगवून येतच आहेत, जगतच आहेत, जागवतच आहेत, सांगतच आहेत, ऐकणाऱ्याची मात्र तयारी हवी. 

जात पंचायतीने बांधलेल्या असतात या स्त्रिया. बाराव्या-तेराव्या वर्षी आई होतात या भटक्या स्त्रिया, गाडगेभर पोट घेऊन अनेक जन्माचा प्रवास करतात या भटके स्त्रिया, काट्याकुट्याचा दऱ्याखोऱ्याचा रस्ता चालतात या भटक्या स्त्रिया, चालता चालता बाळंत होतात या भटके स्त्रिया, स्वतःच्या हाताने आपल्याच बाळाची दगडाने तोडतात नाळ या भटक्या स्त्रिया, जगण्याच्या परंपरेतून वैविध्यपूर्ण ज्ञान मिळवता त्या भटक्या स्त्रिया, परंपरा जोपासतात या भटक्या स्त्रिया, संस्कृतीच्या वाहक असतात त्या, भाषा पोषाख सांभाळत त्या, अनुभव जपतात सांगतात, कटू गोड अनुभव घेत, स्मृतीच्या इतिहासाचे पुस्तकच असतात त्या! देतात गोड बोरे, विचारतात जाब रामाला.

आधुनिकतेला जोडून घेण्याचा करतात प्रयत्न. शिकवतात जीवनाच्या शाळेत आपल्या पिलांना, शिकतात जीवनाच्या शाळेत अनुभवांना समोर ठेवून, थकत नाही त्या कधी, ना कोणाला थकतात. चालत राहतात, जीवन समजून घेत राहतात.  

गाढवावर वाहतात माती आणि दगड, सात माणसाच्या जीवनाचे भराड, देवीचा पोत घेऊन नाचतात रात्रभर, करतात माणसाचा नावाचा जागर, हातोडीच्या घावाने करतात लोखंडाचा गोळा, देतात याला जीवन उपयोगी आकार, हत्याराने बनतात शेतकऱ्यांचे मित्र, सांगत राहतात भविष्य माणसाचे आणि माणुसकीचे, घरोघर जाऊन करतात गोळा फाटक्या चिंध्या आणि देतात त्यांना नवी भांडी, करतात त्यांचा संसार उभा, नाचत राहतात आयुष्यभर बोर्डावर तुमची करमणूक करत, पायाच्या घुंगरातून काढतात आवाज माणुसकीचा, तुमच्या मरणोपरांत जीवनाची करतात क्रियाक्रमे, चार-दोन किलोचं ढोलकं गळ्यात अडकवून गुबू करत राहता दिसभर टिचभर पोटासाठी, तान्हुल्याच्या दवापाण्यासाठी, वश होत नाही तुमच्या आमिषाला.

स्त्रिया असतात तुमच्या आसपास... तुम्ही पाहत असता त्यांची दैनंदिनी. तुम्ही जपत असता तुमच्या स्त्रियांची इभ्रत. एकदा तरी माणुसकीला जागा आणि याही माणसांना माणसं माना. तुमच्याकडून असाच होत राहिला अत्याचार तर याच भटक्या स्त्रियांच्या हातातील आयुधे शस्त्रे बनतील. असाच विपरीत स्थितीतून या स्त्रियांनी आपला भविष्यकाळ उज्ज्वल केला आहे. नुसत्याच कुढत बसल्या नाहीत त्या. व्यवस्थेच्या अवकाशात अंकुरवला आहे आपला श्वास. मुक्तीच्या अनेक संघर्षात दिली आहे साथ. त्यांनी जातपंचायतीला नकार दिला आहे. त्यातील दिव्य करायला आता त्या बांधील नाहीत. शिक्षणाचे महत्त्व त्या आता जाणू लागल्या आहेत. जनाबाई गिऱ्हे, विमलताई मोरे अशांनी त्यांचा भवताल साहित्यात मांडला. हिरकणीबाई चव्हाणने आपल्या मुलाला शिक्षण देऊन डीवायएसपी केले, पारूबाई भोसलेने आपल्या भाच्याला डॉक्टर केले, सखुबाई भोसलेने आपल्या मुलाला प्राध्यापक केले, नर्मदा इंगोलेने आपल्या भावाला साथ दिली, मीरा बाबरने स्वतःला तुरुंगाधिकारी केले, वैशाली भांडवलकर यांची स्त्रियांची अभ्यास करणारी संस्था आहे, पल्लवी रेणके या व्यवसायाने वकील असून लोकधारा संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. अशा भटक्या स्त्रिया आपला व आपल्या भावांचा, मुलांचा व कुटुंबाचा भवताल मुक्तिदायी बनवत आहेत. त्यांनी मोर्चे, संप, धरणे आंदोलनात सहभाग दिला आहे. स्वतः कष्ट करून भविष्यं घडवली आहेत...सलाम त्या लढाऊ स्त्रियांना. 
संपर्क - ९८२२३४८३६१