Home | Maharashtra | Vidarva | Amravati | After showing black flags by project-affected people, there is a clutter in the Chief Minister's meeting in Amravati

प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे दाखवल्याने अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 10:13 AM IST

संतप्त प्रकल्पग्रस्तांनी दिली ठाण्यावर धडक

 • After showing black flags by project-affected people, there is a clutter in the Chief Minister's meeting in Amravati

  परतवाडा - अमरावती मतदारसंघातील भाजप– शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे रविवारी (दि. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजप-शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या दिशेने धाव घेतली. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता.

  परतवाडा येथील नेहरू मैदानात रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास फडणवीसांची सभा सुरू झाली. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या मनोज चव्हाण, प्रमोद धाकडे, विकास राणे व सुनील भाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. या प्रकारामुळे संतप्त भाजप व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काळे प्रकल्पग्रस्तांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी उपस्थित पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेऊन संतप्त भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. मात्र या प्रकारामुळे सभेत काही वेळासाठी प्रचंड गोंधळ झाला. काही खुर्च्यांचीसुद्धा तुटफूट यामध्ये झाली आहे. त्यानंतर झेंडे दाखवणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी ठाण्यात आणले. दरम्यान, “काही समस्या असेल तर त्यांनी आमची भेट घ्यावी. अशा प्रकारचे वर्तन एखाद्या वेळी विरोधकांच्या कुरापतीसुद्धा असू शकतात,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

  राहुल गांधी काल्पनिक बोलत आहेत :
  देशात गांधी घराण्याने गरिबी दूर केली नाही, मात्र मागील पाच वर्षांत शासनाने राबवलेली प्रत्येक योजना गरिबाला केंद्रबिंदू ठेवून राबवली आहे. त्यामुळे देशातील गरिबी मोदीच हटवू शकतात. राहुल गांधी अलीकडे काल्पनिक बोलायला लागले आहेत. देशावर हल्ला झाल्यानंतर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याची ताकद आतापर्यंत अमेरिका, इस्रायल या दोनच देशांकडे होती. आता त्यात भारताचा समावेश झाला आहे. त्यामुळे देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  संतप्त प्रकल्पग्रस्तांनी दिली ठाण्यावर धडक
  विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त त्यानंतर परतवाडा ठाण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सोडण्याची त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, काही वेळानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांची सुटका केली.

Trending