आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाची गरज आहेच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाची गरज नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेने व्यक्त केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश केल्यास त्याचा मुलांवर नकारात्मक, वाईट परिणाम होईल असे मत ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ने (एसएसयूएन) व्यक्त केलेे. संघाचे प्रचारक दीनानाथ बत्रा यांनी स्थापन केलेल्या एसएसयूएनने शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाच्या समावेशाऐवजी मुले,पालकांच्या समुपदेशनाची गरज असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मधुरिमाच्या या विचारमंचावर व्यक्त झालेली मते...
 
लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते.लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनांना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात. लैंगिकतेशी संबंधित विचार ‘विवेकपूर्ण’ बनवणे अभिप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय संस्था हा या प्रकारचे शिक्षण देण्याचा एक योग्य मार्ग समजला जातो.

लैंगिक शिक्षण देण्याची गरज का आहे?
१ भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली पौगंडावस्था (वयात येण्याचे) वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची योग्य ती जाणीव करून देणे आवश्यक आहे.

२ आता शालेय वयापासून मुलं-मुली हे स्मार्टफोन, इंटरनेट वापरतात. विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून दाखवली जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्या नकारात्मक परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून त्यांना निकोप कामजीवनाची ओळख, स्वत:च्या शरीराची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. तसेच समाजात बलात्कार, लैंगिक आत्याचाराच्या घटना, अल्पवयीन मुलींना वैश्याव्यवसाय करायला लावणं, अशा अनेक घटना घडतात. यामागे अनेक कारणं आहेत, पण एक महत्त्वाचं कारणं, ते म्हणजे ‘लैंगिक शिक्षणा’चा अभाव !

३ मुलांना शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, कार्य इत्यादींवरही एक धडा आहे. पण केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग शिक्षक शिकवतात. परंतु, पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जातो, तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जातो. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळांत शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे अनेकदा हा धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येतो. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नाही. हा विषय वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल.
 

पालक काय म्हणतात...

शरीरसंबंध ठेवण्याचं वय कोणतं - राजश्री पोहेकर
माझ्या मते, साधारण ६वीपासून तरी मुलांना लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.शरीरात अचानक होणारे बदल आणि शारीरिक आकर्षण या वयापासूनच वाढतं, त्यामुळे त्यांच्यात होणारे बदल त्यांना स्वीकारणं अवघड जाणार नाही, बऱ्याच वेळा याबाबतीत पुरेशी माहिती नसल्यामुळे मुलं-मुली केवळ शारीरिक आकर्षणाचे बळी ठरतात आणि त्यांच्यात लहान वयातच लैंगिक संबंध निर्माण होतात. असे शरीरसंबंध ठेवण्याचं योग्य वय कोणतं हे मुलांना लहान वयातच बिंबवलं तर आज निर्माण होणारे अनेक लैंगिक प्रश्न सुटतील.
 

मुलांशी संवादाचा मार्ग - जमीर शेख
अनेक वेळा कुटुंबात मुलांशी आमचा लैंगिक विषयावर संवाद होत नाही. पालक म्हणून अनेकवेळा या विषयावर मुलांशी कशा प्रकारे संवाद साधायचा यावर आम्हालाही मर्यादा येतात.  लैंगिक शिक्षण हे शाळेंमध्ये दिले गेले तर आम्हालाही त्या शालेय अभ्यासाच्या निमित्ताने  मुलांशी संवाद साधने सोप्पे होईल. त्यामुळे शाळेमध्ये एखादा तास न घेता स्वतंत्र्य पुस्तक आणि अभ्यासक्रम असावा. या अभ्यासामुळे येणारी पिढी ही लैंगिक साक्षर असेल , ही आत्ताच्या काळाची गरज आहे. 
 

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात... 

तज्ज्ञांकडून शिक्षण दिले जावे - डॉ. संदीप सिसोदे

​​​​​​शाळेत त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून अचूकपणावर भर देत हे शिक्षण दिले जावे.जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र वगैरे विषयांतील तज्ज्ञ माणसे, त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका यांचादेखील त्यात सहभाग असावा. लैंगिक शिक्षणाचा जो भाग वर्गातील पाठामध्ये अंतर्भूत करता येत नाही, त्यासाठी तज्ज्ञांची चर्चात्मक व्याख्याने आयोजित करावीत. कोणत्याही गोष्टीचे दमन केले तर त्यााविषयी उत्सुकता वाढते. तसेच मुलांमध्ये होते. त्यामुळे त्यांना योग्य वयात योग्य ज्ञान देणे गरजेचे आहे.
 
 

मुख्याध्यापिका म्हणतात...

बाेलायला शिकले पाहिजे - उज्ज्वला निकाळजे
लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातूनही मिळाला हवे. मासिक पाळीविषयी मुलींना सांगण्यापेक्षा मुलांनाही किशोर वयात होणारे बदल सांगितले पाहिजे. संवाद राहिला तर गैरसमज दूर होतात, असा अनुभव आहे. शोषण फक्त मुलींचेच होते असे नाही तर मुलांवरही अत्याचार होतात. त्यामुळे शिक्षण आणि संवाद आवश्यक आहे. आताचा विद्यार्थी अधिक शार्प आहे. चुप्पी तोडा बोलायला शिका आणि नाही म्हणायला शिका हेदेखील सांगण्याची गरज आहे. म्हणून लैंगिक शिक्षण देणे गरजेचं आहे. 
 
 

संस्था काय म्हणतात...

लैंगिक शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज - प्रफुल्ल शशिकांत, व्हॉवुल्स ऑफ दि पीपल असाेसिएशन

​​​​​​लैंगिक शिक्षण दिल्यास नकारात्मक परिणाम होतो, असे आजवर कुठल्याही संशोधन किंवा अभ्यासातून निष्कर्ष आलेले नाहीत. याउलट युनेस्कोसारख्या जागतिक संस्थांनी जगभर केलेल्या संशोधनातून लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे. बऱ्याच देशांमध्ये सरासरी ३ पैकी २ मुलींना पाळीबद्दल काहीही माहिती नसते. फक्त ३४ टक्के युवकांना एचआयव्ही बद्दल किमान जुजबी माहिती आहे. डॉ. राणी बंग यांनी महाराष्ट्रभर हजारो युवकांसाठी ‘तारुण्यभान‘ शिबिरे घेतली. त्या शिबिरांमध्ये अतिशय सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुणांनाही असलेले अपुरे लैंगिक ज्ञान, माहिती, गैरसमज यांची पातळी पाहिली तर लक्षात येईल की लैंगिक शिक्षणाचे तीनतेरा वाजलेले आहेत.आम्ही या विरोधकांच्या लैंगिक शिक्षणााबद्दल परीक्षा घेतली तर मला खात्री आहे की, त्यातील बहुतांश लोक नापास होतील.
 
 

विद्यार्थी काय म्हणतात...

गैरप्रकारांना आळा बसेल  - सूरज गवई 
बारावीपर्यंत बऱ्याच गोष्टी संवादातच होत नसल्याने कळत नाहीत. मुलींना विशेष वर्ग घेऊन सांगितले जाते.परंतु मुलांना सांगितले जात नाही. जागरुकतेसाठी विद्यार्थी असो वा विद्यार्थिनी, दोघांनाही किशोरवयात होणारे बदल, जागरुकता याविषयी माहिती दिली पाहिजे. जागरुकता झाल्यास आणि माहिती मिळाल्यास गैरप्रकारांनाही आळा बसेल.
 

वयोगटानुसार माहिती द्या - सिद्धी बोरसे
बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात. त्याची माहिती व्हायलाच हवी. मुली असो वा मुले दोघांनाही होणाऱ्या बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. आमच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा मुद्दा आहे. तो आम्हाला शिकवला जातो. परंतु या विषयावर सर्वच जणांना शिकवले जाते अथवा मोकळेपणाने बोलतातच असे नाही. प्रत्येक वयोगटात होणारे बदल हे मुलगा असो वा मुलगी, जागरुकतेसाठी शिकवले पाहिजेत.
 

मोकळेपणाने संवाद हवा - जयेश गाडे 
किशोरवयीन मुलांमध्ये होणारे बदल असो वा लैंगिक शिक्षण, याविषयी आपल्याकडे मोकळेपणे बोलले जात नाही. बऱ्याच वेळा घरातही पालक लाज वाटते, असे विषय कसे बोलायचे म्हणून बोलत नाहीत. संवाद आणि विषयांबद्दल माहिती देताना खुलेपणा असेल तर गैरसमज दूर होतील. त्यामुळे जसे शैक्षणिक  आणि करिअर विषयावर मार्गदर्शन करतात. तसेच जीवनोपयोगी विषयांवरही मार्गदर्शन हवेच.
 

संस्था काय म्हणतात...

भीती अनाठायी - हरीश सदानी

​​​​​​लैंगिक शिक्षण आणि लंैगिकता या शिक्षणात फरक आहे. मानवी शरीरातील अवयव, बाळ कसं जन्मतं, शरीरसंबंध, पुरुष- स्त्रीचे जननेंद्रिय आदी माहिती लैंगिक शिक्षणात येते. लैंगिकता शिक्षण मात्र व्यापक आहे. यात आपण स्वत:च्या लैंगिकतेबद्दल किती सजग आहोत, लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने विचार मांडू शकतो का, याचा विचार केला जातो. एखाद्या व्यक्तीने नातेसंबंधामध्ये आपलं मत मांडून समाेरील व्यक्तीनं ते मान्य करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लैंगिक शिक्षण दिले गेल्यास मुलं प्रयोगशील होतील आणि त्याचे वाईट परिणाम दिसून येतील ही अनाठायी भीती दिसून येते. आठवी, नववीच्या मुलांना हे शिक्षण मिळायला हवं. पण सरकारच्या पातळीवर इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. युनिसेफ आणि यशदा या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यात १०० शाळांमधील मुलांना दिलेल्या लैंगिक शिक्षणाचे परिणाम अजून तरी समोर आलेले नाहीत. दुसरे म्हणजे किशोरवयीन मुलीला आई किंवा इतर स्त्रियांकडून मासिक पाळीविषयी सांगितले जाते. पण  किशोरवयीन मुलाला मात्र स्वप्नावस्थेबद्दल सांगितले जात नाही. अशा वेळी लैंगिक शिक्षणाची खरी गरज भासत असते.
- मानद सचिव, मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज (मावा) संस्था.
 

यात काहीच वाईट नाही - अच्युत बोरगावकर
एका विशिष्ट समाजाची संस्कृतीच सर्व समाजाने स्वीकारली पाहिजे, असा विचार करणाऱ्या लाेकांना हे शिक्षण नको आहे. लैंगिक शिक्षण तर नकोच आहे. विषमता नैसर्गिकच आहे, असे त्यांना वाटते. पुरुष श्रेष्ठे, बाई ही कनिष्ठच असायला हवी. ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे नकोत. त्यांना ज्ञानाचा मक्ता फक्त एकाच वर्गाकडे हवा. असे लोक आपले हित जोपासण्यासाठी नेहमीच बदलांना विरोध करत आले आहेत. कारण त्यांच्या सत्तेला सुरुंग लागेल, असे त्यांना वाटत असते. शरीर साक्षरतेविषयी बोलायचे झाले तर, वाढत्या वयात शरीराची माहिती असणे, यात काहीच वाईट नाही. मुलांना या बदलंाची माहिती मिळाली मुले अधिक जबाबदारीने वागतील, ते शहाणे होतील. बालपणापासून लैंगिक शिक्षण मिळाल्यास त्याच्याकडे अश्लील म्हणून नव्हे तर जीवनविषयक आवश्यक ज्ञान म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येक नागरिकांत विकसित होईल. इंटरनेटसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यमांमुळे सध्या सर्वांना सर्व प्रकारचे ज्ञान खुले झाले आहे. मात्र त्याबाबतची परिपूर्ण आणि सर्व शंका निरसन करणारी माहिती फक्त शालेय अभ्यासक्रमातूनच मिळू शकते.
- तथापि ट्रस्ट, पुणे, 
(लैंगिक शिक्षणाचा प्रसार-प्रचार करतात)