Home | International | Other Country | There is a possibility of impeachment on Trump

ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची दाट शक्यता, माजी सहकाऱ्याचे मत; मी निर्दोष- डोनाल्ड ट्रम्प

वृृत्तसंस्था | Update - Aug 24, 2018, 06:15 AM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काही महिन्यांतच महाभियोगाला सामोरे जावे लागू शकते.

 • There is a possibility of impeachment on Trump

  वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काही महिन्यांतच महाभियोगाला सामोरे जावे लागू शकते. त्यांचे माजी वकील मायकल कोहेन दोषी आढळले आहेत. हे प्रकरण ट्रम्प यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचार अभियानादरम्यान त्यांचे सल्लागार असलेले मायकल कॅप्युटो यांनी ही शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी ८ प्रकरणांमध्ये कोहेन दोषी आढळले आहेत. करचुकवेगिरी, दिशाभूल करणारी वक्तव्ये, बँकांची फसवणूक, ट्रम्प यांचे शारीरिक संबंध असलेल्या दोन महिलांना लाच दिल्याप्रकरणी त्यांनी गुन्ह्यांची कबुली मंगळवारी दिली होती.


  विरोधी पक्ष असलेल्या डेमॉक्रॅटिक सदस्यांना हे मुद्दे महाभियोगासाठी पुरेसे आहेत, असे सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत मायकल कॅप्युटो यांनी म्हटले आहे. सध्या मध्यावधी निवडणुका सुरू आहेत. यामध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाला अधिक कौल मिळाला तर महाभियोग निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कचे रिपब्लिकन प्रतिनिधी ख्रिस कोलिन्स आणि कॅलिफोर्नियाचे डंकन हंटर यांच्याविरुद्ध अभियोग प्रस्ताव आणला होता. त्यामुळे कनिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्षाची स्थिती दुबळी होऊ शकते. खरी समस्या कनिष्ठ सभागृहातच आहे, असे मायकल कॅप्युटो म्हणाले.


  कोहेनचे वकील म्हणतात...
  मायकल कोहेन यांचे वकील लॅनी डेव्हिस यांनी म्हटले आहे की, लाच दिल्याप्रकरणी कोहेन दोषी आहेत. कोर्टाने तसा निर्णय दिला आहे. त्यांना शिक्षा झाली तर मग डोनाल्ड ट्रम्प निर्दोष कसे काय असतील? ती देयके देणे हा कोहेन यांचा गुन्हा असेल तर ट्रम्प यांचा का नाही? अमेरिकेत देशद्रोह, लाचखोरी आणि विश्वासघात हे तीन गंभीर गुन्हे आहेत. आता कनिष्ठ सभागृहाची जबाबदारी आहे की, त्यांनी राष्ट्राध्यक्षांना शिक्षा द्यावी. अमेरिकी कायद्याप्रमाणे महाभियोगासाठी दोनतृतीयांश बहुमत गरजेचे आहे.


  नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल
  कप्युटो यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निडवणुकीनंतर राष्ट्राध्यक्षांचे संख्याबळ ठरेल. यानंतर तांत्रिक अडचण होईल वा नाही यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल. ही निवडणूक रिपब्लिकन पक्षासाठी खरी कसोटी आहे. ६ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ सभागृहासाठी रिपब्लिकन पक्षाला मते मिळाली तर पुढचा मार्ग सुसह्य होऊ शकतो. मतदारांनी कौल दिला तर त्यांना महाभियोग नको आहे, हेच स्पष्ट होईल.


  मी निर्दोष; तो माझा पैसा होता, अभियानाचा नव्हे : ट्रम्प
  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मायकल कोहेन यांची वक्तव्ये खोटी आहेत. २०१६ च्या निवडणुकीपूर्वी आपण कोणालाही लाच देऊ केलेली नाही. कोहेन यांची कबुली, हा ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाला दिलेला सर्वात मोठा धक्का आहे. कोहेन काल्पनिक कथा रचत आहेत, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा ट्विट केले की, 'कोहेन यांच्या कृतीला गुन्हा म्हणता येणार नाही.' 'फॉक्स अँड फ्रेंड्स'मध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली. जी काही देयके त्या वेळी दिली गेली ती मी स्वत:च्या खिशातून खर्च केलेली रक्कम होती. कोहेन यांना कदाचित हे माहीत नसावे. पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स, प्लेबॉयची मॉडेल कारेन मॅकडॉगल या दोन व्यक्ती निवडणूक प्रचार मोहिमेचा भाग नव्हता. याविषयी मी पूर्वीही ट्विट केलेले आहे, असे ट्रम्प म्हणाले. वॉशिंग्टन येथील आर्थिक निधीचे तज्ज्ञ केट बेलिन्स्की यांनी म्हटले आहे की, कायदेशीरदृष्ट्या आता ट्रम्प पुरते अडकले आहेत.

Trending