Home | News | there is impossible to come faction in Bollywood in political support

राजकीय पक्षांना समर्थन असो की विरोध, बॉलीवूडमध्ये दुफळी येणे अशक्य

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 12, 2019, 11:12 AM IST

बॉलीवूडमधील दिग्गजांचे मत; काम करताना राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली जात नाही

 • there is impossible to come faction in Bollywood in political support

  मुंबई - चित्रपट क्षेत्रातील काही कलाकारांनी देशाची घटना धोक्यात असल्याने भाजपला मत देऊ नका, असे पत्रक काढले होते. त्यानंतर आणखी काही कलाकारांनी एक पत्रक काढून देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार हवे असल्याचे सांगत भाजपला मत देण्याचे आव्हान केले आहे. यावरून कलाकारांत दुफळी माजली असल्याचे बोलले जात आहे. परंतु, बॉलीवूडमधील अनेकांना असे वाटत नाही.


  प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि आपली भूमिका जाहीर करण्याचा अधिकार आहे, परंतु याचा बॉलीवूडमधील कामावर काही परिणाम होणार नाही, असे अभिनेत्री व काँग्रेसची लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकरने सांगितले आहे. ती म्हणाली, देशात फक्त बॉलीवूडमध्येच जात-पात, धर्म, राजकीय विचारधारा पाहिली जात नाही. सगळे मिळून काम करतात व प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपले जाते. एखाद्याला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तो आवाज उठवतोच. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी, कलाकार राजकीय पक्षांना घाबरतात, कारण त्यांचे चित्रपट येत असतात. चित्रपटावर कोट्यवधी रुपये व शेकडो लोकांचे पोट अवलंबून असते. त्यामुळे कधीकधी सरकारचे पायही पकडावे लागतात. देव आनंद यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात आवाज उठवला होता. अनेक कलाकार पुढे आले होते, परंतु नंतर काय झाले ते सर्वश्रृत आहे. आत्ताही तशीच परिस्थिती आहे.

  पूर्वी एकच कलाकार दोन पक्षांचा प्रचार करायचा
  यापूर्वीही काही कलाकारांनी विविध राजकीय पक्षांसाठी काम केले आहे. त्यानंतर हे कलाकार एकत्र काम करतानाही दिसले. पूर्वी तर निवडणुकीच्या प्रचारात एकच कलाकार दोन पक्षांचा प्रचार करतानाही दिसला आहे. अर्थात तो पैसे मिळत असल्याने प्रचार करत होता. परंतु हे सर्व असले तरी बॉलीवूडमध्ये सर्व एकदिलाने काम करतात असे बॉलीवूडमध्ये ५०० पेक्षा जास्त चित्रपटांच्या प्रचाराचे काम पाहिलेल्या राजू कारिया यांनी सांगितले. १९७५ मध्येही देव आनंद यांनी आणीबाणीच्या विरोधात बॉलीवूडमधील कलाकारांना एकत्र केले आणि राजकीय पक्षाची स्थापना केली; परंतु नंतर पक्ष संपुष्टात आला, असेही ते म्हणाले.

  दुफळी निर्माण झाल्याचे वाटत नाही
  चित्रपटविषयक तज्ज्ञ तरण आदर्श यांनी सांगितले, बॉलीवूडमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे मला वाटत नाही. कलाकारांनी निवडणुकीला उभे राहणे नवे नाही. अमिताभ, शत्रुघ्न सिन्हापासून हेमा मालिनी, गोविंदा व आता ऊर्मिला निवडणुकीला उभी आहे. आवडीच्या पक्षाशी कलाकार जोडले जातात. परंतु, काम करताना तो नेमक्या कोणत्या पक्षाचा हे कधीच पाहिले जात नाही.

  १०० कलाकारांचा विरोध, ९०७ कलाकारांकडून समर्थन

  भाजप सरकारमुळे घटना धोक्यात, मत देऊ नका
  ही इतिहासातील अत्यंत गंभीर निवडणूक असून गीत, नृत्य, हास्य, राज्यघटना धोक्यात आहे. अनेक संस्थांचा गळा घोटला आहे. प्रश्न विचारण्याची मुभा उरली नाही. देश युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला, हिंदू-मुस्लिम तेढ वाढली, दलितांवर अत्याचार वाढले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे भाजपला मत देऊ नका, असे आवाहन काही कलाकारांनी केले होते.

  मोदींच्या नेतृत्वात मजबूत सरकार, ते काळाची गरज
  देश भ्रष्टाचारमुक्त, शेतकऱ्यांचे कल्याण करणारे, जगात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे सरकार ५ वर्षांत आपल्याला मिळालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत राहणे ही काळाची गरज आहे. देशासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान असताना एक मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार सत्तेवर राहणे गरजेचे आहे, असे समर्थनार्थ आलेल्या कलाकारांनी म्हटले आहे.

Trending