विधानसभा 2019 / 'सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचे', दहिसरमध्ये 'राज'गर्जना


दहिसरमध्ये सरकारवर राज ठाकरेंनी तोफ डागली 

Oct 13,2019 09:08:00 PM IST

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या एका मागे एक सभा सुरुच आहेत. आज त्यांची मुंबईतील दहिसरमध्ये सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. महायुतीच्या होर्डिंगखाली लिहिलंय 'हीच ती वेळ', यावरून राज यांनी युतीला टोला लगावला. दहिसरनंतर त्यांची दिंडोशीमध्ये सभा आहे.


राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

> यवतमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखू असे सांगून भाजप सत्तेत आले, पण यांच्या काळात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

> देश चालवता येत नाही, म्हणून मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 1 लाख 70 हजार कोटी घेतले, ते तुमचे पैसे आहेत. मोदी सरकारने नोटबंदी केली, त्यानंतर 10 दिवसांत मी बोललो होतो की निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल. आज 3 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत.

> सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचे. सरकार म्हणते, रिझर्व्ह बँकेचे काम आहे. रिझर्व्ह बँक म्हणते, सरकारी बँका आमच्या आखत्यारीत, को ऑपरेटिव्ह बँकांशी आमचा संबंध नाही.

> तुमच्या हातात बहुमत असताना उद्योगधंदे बंद का पडत आहेत? पारले-जी कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असे सांगितले.

> काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार नालायक म्हणून यांच्या हातात सत्ता दिली. भाजप-सेनेने 2014 च्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती. सहकाराला आर्थिक शिस्त लावण्यासाठी नवा सहकार कायदा आणणार होते. भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल करून वसुली करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार होते.

> शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवछत्रपतींचं खरं स्मारक कुठले असेल, तर ते त्यांचे गडकिल्ले आहेत. त्या किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे. पण त्याच्यावरच खेळ सुरू आहे. समुद्रातल्या स्मारकाचे काय झालं? हे कुणीही विचारणार नाही.


> शिवसेना-भाजपने जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. पण त्याचे नंतर काहीही झाले नाही. सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

X