विधानसभा 2019 / भाजपत आयारामांना पचवून पुढे जाण्याची ताकद; पक्षाच्या कार्यकर्त्यांना धोका नाही - राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची ग्वाही

सेव्ह मेरिटचा परिणाम निवडणुकीवर नाही
 

प्रतिनिधी

Sep 20,2019 10:12:00 AM IST

नागपूर - सध्या भाजप सर्वात आकर्षक पक्ष असल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. पक्षात मोठ्या संख्येने बाहेरून लोक येत आहेत. पण, त्याचा पक्षाच्या प्रकृतीवर तिळमात्रही परिणाम होणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाची प्रकृती ठणठणीत आहे, अशी हमी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी येथे दिली. नागपूरला आले असता आयोजित पत्रपरिषदेत ते बाेलत होते.


भाजपत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची संधी हिरावली जाईल. या इनकमिंगमुळे डावलले जाण्याच्या भावनेने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. पण, यात काहीही तथ्य नाही. बाहेरून नव्याने पक्षात येणाऱ्यांमुळे भाजपच्या मूळ प्रकृतीवर काेणताही परिणाम होणार नाही आणि कोणालाही डावलले जाणार नाही. या सर्वांना पचवून भाजप पुढे जाईल, असे सहस्रबुद्धे म्हणाले.


महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ कलम ३७०, ट्रिपल तलाक हेच मुद्दे राहतील, असे वाटत असले तरी तसे मात्र अजिबात नाही. या निवडणुकीत स्थानिक, राज्यस्तरीय तसेच इतर अनेक सामायिक मुद्दे राहू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे प्रचारात येतील, असे वाटत नाही.


मंदीबाबत सरकारकडून उपाययोजना सुरू
सध्या जागतिक मंदी सुरू आहे. त्याचा फटका भारतालाही बसला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसत असले तरी खूप काळजी करण्याचेही कारण नाही. केंद्रातील सरकार जागरूक आणि सावध आहे. सरकार वेळीच आपल्या धोरणांमध्ये गरज पडल्यास बदलही पडेल. याबाबत अर्थमंत्री सर्व संबंधित घटकांशी संवाद साधून उपाययोजना करत आहेत, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

X
COMMENT