आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाभास : पिण्यासाठी पाणी नाही, पाणी विकणारे ३० कारखाने जोरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिनाभर पुरवण्यासाठी मनमाडकर अशी लहानमोठी भांडी भरून ठेवतात. - Divya Marathi
महिनाभर पुरवण्यासाठी मनमाडकर अशी लहानमोठी भांडी भरून ठेवतात.

मनमाड - नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचं वैशिष्ट्य आहे तिथलं हवामान. जास्त तापमान नाही व जास्त थंडीही नाही. आर्द्रताही बेताचीच. हेच कारण होते की ज्यामुळे ब्रिटिशांनी या भागात सैन्याची छावणी उभारली. इथे लोखंडाला लवकर गंज लागत नाही म्हणून रेल्वेने इथे ब्रिज वर्कशाॅप सुरू केले. धान्याला कीड लागत नाही म्हणून फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडियाने आपले देशातले सर्वात मोठे गोदाम इथेच उभारले. हेच कारण आहे ज्यामुळे भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने इथे इंधनाचा डेपो उभारला. या प्रकल्पांच्या निमित्ताने हजारो कर्मचारी या शहरात आले व इथले रहिवासी बनले. पण हेच वैशिष्ट्य या शहराच्या मुळावर उठले आहे. पाण्याचे शाश्वत  स्त्रोत नसताना या शहरावर पाण्यासाठी मोठा भार वाढला आहे. परिणामी सध्या महिनाभराने मनमाडच्या नळांना पाणी सोडण्यात येते आहे. 


शहरात पाणी येण्याच्या तारखेवर सारे काही अवलंबून असते. ती  तारीख पाहून लग्न ठरवली जातात. नोकरी-व्यवसायानिमित्त मनमाड ते मालेगाव अप-डाऊन करणारे काही रहिवासी सायंकाळी परत येताना मालेगावहून पाण्याचे कॅन भरून घेऊन येतात. यामुळे किमान ४०% मनमाडकर गाव सोडून नाशिकला राहायला गेले आहेत. बहुतांश कामगारही शहरात राहत नाही. ते नाशिकला जातात. त्यामुळे या शहराला मोठ्या प्रकल्पांचा व्यावसायिक उलाढालीसाठी उपयोग होत नाही, अशी खंत मनमाड बचाव समितीचे प्रमुख अशोक परदेशी व्यक्त करतात.
असाही विरोधाभास : मुंबईहून म्हणजे तब्बल २५२ किलोमीटरवरून या शहराच्या डेपोमध्ये पाइपलाइनने इंधन येते. तेच पुढे ७५० किमीहून जास्त अंतरावर थेट दिल्लीपर्यंत पाठवले जाते. पण या शहरासाठी पाणी आणण्याच्या ७०-८० किमीच्या योजनेला मात्र आडकाठी येत राहते, हेच येथील संवेदनशील नागरिकांचे दुखणे आहे. केवळ योजनापूर्तीत अडथळे येतात असे नाही तर ज्या योजनेतून मनमाड, नांदगावसाठी पाणी आणण्याचे नियोजन होते त्यात बदल करून ते पाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे वळवले, असा मनमाड बचाव कृती समितीचा आरोप आहे. 


नोकरीच्या निमित्ताने देशभरातून हजारो लोक इथे राहायला अाले आहेत. त्यामुळे या शहराची पाण्याची गरज वाढली आहे. ती भागवली जावी यासाठी उपाय करण्याची कोणतीही तयारी प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची नव्हती. वेळोवेळी आंदोलने, मोर्चे झाले, उपोषणे झालीत. पण कोणीही दाद देत नव्हते. त्यामुळे मनमाडचे भूमीपुत्र अॅडव्होकेट सागर कासार यांनी या प्रश्नासाठी हायकोर्टात मनमाड बचाव समितीच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. ही याचिका जानेवारी २०१३ ला दाखल झाली. तेव्हापासून सचिव पातळीवरून या शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या कामाचा आढावा कोर्टात सादर होतो आहे. करंजखेड धरणातून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित आहे. ओझरखेडचा कालवा वाहेगावसाळपर्यंत वाढवून वाघदर्डीपर्यंत पाणी आणता येईल. ती योजना कमी खर्चाची आणि उपयुक्त योजना आहे. हायकोर्टाच्या माॅनिटरींगमुळे पुढच्या अडीच वर्षात योजना मार्गी लागू शकते, असे परदेशी यांचे म्हणणे आहे. 

 

शहरात प्यायला नाही, विकायला मात्र मुबलक पाणी
महिनाभरातून एकदा पाणी सोडले जात असले तरी शहरात मिनरल वाॅटरचे ३० कारखाने आहेत. ते भूगर्भातील पाणी उपसून मिनरल वाॅटरच्या बाटल्या बनवतात आणि रेल्वे स्टेशनवर त्या विकल्या जातात. या कामात मुख्यमंत्र्यांच्या सचिवांपैकी एक असलेल्या प्रवीण दराडेंचा पुतण्याच पुढे  आहे, असेही सांगितले जाते. 

बातम्या आणखी आहेत...