अयोध्या वाद / मूर्ती, गाभाऱ्यात पूजेचे कोणतेही पुरावे नाहीत; अयोध्या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांचा दावा

कोर्ट म्हणाले : हे सत्य नाही, एका साक्षीदाराने याची पुष्टी केली

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 20,2019 08:05:00 AM IST

नवी दिल्ली - अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी २७ व्या दिवशी सुनावणी झाली. दोन तासांच्या या सुनावणीत मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी युक्तिवाद केले. धवन म्हणाले, मशिदीच्या घुमटाला श्रीरामांचे जन्मस्थान असल्याची कहाणी १९८० नंतरच सुरू होते. तेथे मंदिर होते, तर ते कसे होते. साक्षीदारांनी मंदिराबाबत दिलेले जवाब विश्वासपात्र नाहीत. लोक घुमटाची पूजा करत होते याचे कोणतेही पुरावे नाहीत. हिंदू बाहेरील चबुतऱ्यावरच पूजा करत होते. हिंदू पक्षकारांच्या एका साक्षीदाराने गाभाऱ्यात १९३९ मध्ये मूर्ती नव्हती, केवळ एक फोटो होता, असे सांगितले होते. त्यामुळे मूर्ती आणि गाभाऱ्याचा कोणताही पुरावा नाही.


यावर न्या. अशोक भूषण म्हणाले, हिंदूंनी गाभाऱ्यात पूजा केल्याचे पुरावे नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. रामसूरत तिवारी नामक एका साक्षीदाराने १९३५ पासून २००२ पर्यंत तेथे पूजा केली जात होती, असे सांगितले आहे. तुम्ही पुरावे चुकीच्या पद्धतीने खोडत आहात. यावर अॅड. धवन यांनी न्या. भूषण यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टिप्पणी केली. ते म्हणाले, “तुमची भूमिका आक्रमक आहे. तुम्ही घाबरल्यासारखे वाटत आहात.’ यावर न्या. चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत आक्षेप घेतला. सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींबाबत तुम्ही असे शब्द वापरू शकत नाहीत, असे त्यांनी सुनावले. रामलल्लाचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी न्या. भूषण यांची बाजू घेतली. यानंतर अॅड. धवन यांनी सरळ माफी मागितली.

... आणि तणाव निवळला
अॅड. धवन यांच्या न्या. भूषण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला तणाव नंतर एकदम निवळला. याचे कारण होते अॅड. धवन यांनी सांगितलेला एक किस्सा. धवन म्हणाले, मी केम्ब्रिजमध्ये होतो तेव्हा कॉलेजचे मुख्य गेट बंद असे. कुणाला आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्याची ओढ असायची, तेव्हा भिंतीवरून उड्या मारून जावे लागत असे. मी काही अॅथलेटिक्सचा खेळाडू नव्हतो. त्यामुळे भिंतीवरही चढू शकत नव्हतो.


यावर सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी विचारले, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये होता? धवन यांनी सांगितले, “एम्मा कॉलेजमध्ये.’ सरन्यायाधीशांनी मग विचारले, “तुम्ही भिंत केव्हा ओलांडली?’ ... यावर कोर्टात अचानक हंशा पिकला. धवन म्हणाले, “मला भिंतीशिवाय काहीही आठवत नाही. आणखी काही माहिती असेल तर बंद लिफाफ्यात देईन.’ हा किस्सा एवढ्यावरच थांबला नाही. सरन्यायाधीश म्हणाले, “नको... सीलबंद कव्हर प्रक्रिया बंद आहे.’ मुस्लिम पक्षकारांचे वकील अॅड. धवन यांना शाप देणारे चेन्नई येथील प्रोफेसर एन. शनमुगम यांनी अखेर धवन यांची माफी मागितली. शनमुगम यांनी धवन यांना एक पत्र लिहून मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत शाप देण्याची धमकी दिली होती. यावरून धवन यांनी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या नोटिशीनंतर गुरुवारी शनमुगम यांच्या वतीने अॅड. एम. वेलमुरुगन उपस्थित झाले. त्यांनी या पत्राबद्दल खेद व्यक्त करून प्रोफेसर शनमुगम बिनशर्त माफी मागत असल्याचे सांगितले. यानंतर अवमाननेची कारवाई बंद करण्यात आली.

X
COMMENT