आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक वापरास मुदतवाढ नाही; पुढील आठवड्यापासून सर्वसामान्यांवरही कारवाई: पर्यावरणमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात सध्या प्लास्टिक बंदी लागू असून प्लास्टिक उत्पादकांना पुनर्चक्रीकरणाची व्यवस्था उभारण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांकडे असलेला प्लास्टिकचा साठा नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालावधीत वाढ न करण्याचा निर्णय पर्यावरण विभागाने घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या प्लास्टिक उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून पर्यावरण विभागाच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. 


राज्यात तीन महिन्यांपूर्वी लागू झालेल्या प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्याबाबत मंगळवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम, विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत आतापर्यंत प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यभरात झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्लास्टिकचा साठा असलेल्या व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्लास्टिकचा साठा नष्ट करण्यासाठी तसेच पुनर्चक्रिकरणाची व्यवस्था उभारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत पर्यावरण विभागातर्फे देण्यात आली होती. ही मुदत येत्या ३० सप्टेंबर रोजी संपणार असून या कालावधीत पुनर्चक्रिकरणाची व्यवस्था उभारण्याच्या प्रक्रियेला म्हणावा तसा वेग आला नसल्याने आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी उत्पादक संघटनांच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले असून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश कदम यांनी दिले.

 
कारवाईबाबत साशंकता 
आतापर्यंत वैयक्तिक स्तरावर प्लास्टिकचा वापर करणारे कारवाईच्या कक्षेबाहेर होते. या सर्वांना आता कारवाईच्या कक्षेत सामावून घेण्यात येऊन प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला सुचवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदीच्या कायद्याच्या अनुषंदाने कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई, ठाणे, नाशिक,नागपूर यासारख्या मोठ्या महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कारवाईचा वेग कितपत वाढेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...