आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is No Need For Congress To Be Happy Right Now; Bhargava's Suggestive Warning

मध्य प्रदेशमधील सत्तानाट्य : काँग्रेसने सध्या खुश होण्याची काहीही गरज नाही; भार्गव यांचा सूचक इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी एका विधेयकावर मतविभागणीच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केल्यानंतर गुरुवारी, ‘काँग्रेसने सध्या खुश होण्याची काहीही गरज नाही,’ असा सूचक इशारा दिला. 


पत्रकारांशी संवाद साधताना भार्गव म्हणाले की, ‘बुधवारी विधानसभेत झालेला घटनाक्रम म्हणजे विश्वासदर्शक ठराव नव्हता. सरकारने विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले असते तर सरकारच्या बाजूने किती आमदार आहेत हे समजले असते. तेव्हा भाजपनेही व्हीप जारी केला असता. बुधवारी जे झाले ते मुलांच्या नाटकासारखे झाले, त्याला फारसे महत्त्व नाही. काँग्रेस पक्षाने सध्या खुश होण्याची काहीही गरज नाही. काँग्रेस पक्ष एकटाच धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाला आणि प्रथम आला.’ भाजपच्या दोन आमदारांना काँग्रेसला पाठिंबा दिल्याबाबतच्या प्रश्नावर भार्गव म्हणाले की, या दोन्ही आमदारांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सध्या काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. या दोन आमदारांना काय आश्वासन देण्यात आले यावरही चर्चा होईल. बुधवारच्या घटनेबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नाही आणि वेळ आल्यावर ते सिद्धही केले जाईल, असा दावाही त्यांनी केला. भार्गव म्हणाले की, विरोधकांनी विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली, पण सरकारच्या मंत्र्यांनीच त्यावर मतविभागणी करण्यावर भर दिला, असे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपचे राजकारण विश्वासावर आधारित आहे. आम्ही आमच्या आमदारांची हेरगिरी करत नाही.


बुधवारच्या घटनाक्रमानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार राकेश सिंह हे त्वरित भोपाळमध्ये दाखल झाले आणि त्यांनी गोपाल भार्गव तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी एकत्र चर्चा केली. विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपच्या दोन आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान का केले याची कारणे त्यांनी जाणून घेतली. त्यांनी भार्गव आणि चौहान यांच्याशी स्वतंत्र चर्चाही केली. या चर्चेची माहिती ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला देणार आहेत. 

 

भाजप एकजूट; पक्षात कुठलीही गटबाजी नाही : प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांचा दावा
मध्य प्रदेशमधील भाजप एकजूट आहे, पक्षात कुठलीही गटबाजी नाही, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी गुरुवारी केला. सिंह हे जबलपूरचे लोकसभा खासदार आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही बुधवारच्या राजकीय घटनाक्रमानंतर त्यांनी त्वरित भोपाळला धाव घेतली आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वकाही नियंत्रणात आहे, अशी प्रतिक्रियाही सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, आम्ही मतदान विभाजनाची मागणी केलीच नव्हती. आमच्यासाठी सर्व स्थिती अनुकूल आहे. काळजी करण्यासारखे काहीही घडले नाही. 
 

दोन्ही आमदारांनी चौहान यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची केली होती तक्रार
भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, सरकारच्या बाजूने मतदान करणारे नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या दोन्ही आमदारांच्या संपर्कात भाजप आहे. त्यांनी काँग्रेसकडे जाऊ नये, त्यांना पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सूत्रांनी सांगितले की, त्रिपाठी आणि कोल यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती आणि भाजपमध्ये आपले म्हणणे ऐकून घेतले जात नाही याबद्दल निषेधही नोंदवला होता. त्यावर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असे आश्वासन चौहान यांनी त्यांना दिले होते. मात्र, त्यानंतरही या दोन्ही आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.