आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कार्यकर्त्यांच्या अटकेमागे राजकीय हेतू नाही : सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पुण्याजवळ कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर नक्षल्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच दिग्गज कार्यकर्त्यांची नजरकैद सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यांनी वाढवली. शिवाय, ही अटक राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचे स्पष्ट करून एसआयटी चौकशीची मागणीही फेटाळून लावली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू ठेवावा, असे निर्देश देत न्यायालयाने या कार्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला. या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने कार्यकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या भूमिकेवरून त्यांना चांगलेच फटकारले. 


वरवरा राव, अरुण फरेरा, वरनान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी नक्षल्यांची संबंध असल्याचे पुरावे हाती लागल्याचा दावा करत अटक केली होती. कोरेगाव भीमा हिंसाचारनंतर झालेल्या या कारवाईच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितल्यावर सर्वांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. 


मुर्खपणासाठी काँग्रेस एकमेव जागा - अमित शहा
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात सध्या मुर्खपणासाठी काँग्रेस ही एकच जागा शिल्लक आहे, असेही ते म्हणाले. 


कुणी चौकशी करावी हे आरोपी ठरवणार नाहीत 
न्या. खानविलकर म्हणाले, या प्रकरणात कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी व तपास व्हावा हे ठरवण्याचा अधिकार आरोपींना नाही. त्यांनी या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणीही फेटाळून लावली.


मतभेद जिवंत लोकशाहीचे लक्षण; न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी मांडले वेगळे मत 
घटनापीठातील न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी न्या. मिश्रा आणि न्या. खानविलकर यांनी दिलेल्या निकालाशी आपण असहमत असल्याचे स्पष्ट केले. मतभेद असणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. कुणी विरोधात बोलत असेल तर त्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. आधाराविना या पाच जणांना अटक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांची भूमिका पक्षपाती असून तपासावर विश्वास ठेवता येणार नाही, असे न्या.चंद्रचूड यांनी नमूद केले. एसआयटी चौकशीच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. 


पोलिस आयुक्तांकडून पथकाचे कौतुक 
पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेनंतर केलेल्या कारवाईवर निकालामुळे शिक्कामोर्तब झाले. लवकरच दोषरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिस आयुक्त के. वेकंटेशम यांनी सांगितले. या प्रकरणी तपास पथकाचे त्यांनी कौतुक केले. 


सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा 
अटकेतील पाचही कार्यकर्ते सत्र न्यायालयात दाद मागू शकतील. नक्षल्यांशी संबंध असल्याचे पोलिस व सरकारचे आरोप कपोलकल्पित असल्याचे नमूद करून कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात अटकेला आव्हान दिले होते. 


पाेलिसांचा हेतू वाईट नसल्याचे सिद्ध 
निकालाचे मी स्वागत करतो. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नव्हता. सज्जनांना त्रास दिला जातोय असे वातावरण तयार केले जात होते.पोलिसांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 


प्रथमदर्शनी नक्षली संबंधांचे पुरेसे पुरावे 
तीन सदस्यीय घटनापीठाने ही सुनावणी करताना २-१ अशा बहुमताने कार्यकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. ही अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर म्हणाले, ही अटक राजकीय हेतूने करण्यात आलेली नाही. उलट प्रथमदर्शनी नक्षल्यांशी या कार्यकर्त्यांचे संबंध असल्याचे पुरावे आहेत. यावरून बंदी घालण्यात आलेल्या भाकपशी (माओवादी) या पाचही जणांचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. 

बातम्या आणखी आहेत...