Boxing / मेरी कोमच्या पत्रामुळे विश्व चॅम्पियनशिपसाठी चाचणी नाही; विरोधी खेळाडूंना चाचणीला आल्यावरही उतरूही दिले नाही

५१ किलो गटातील बॉक्सर निखत जरीनने फेडरेशनला पत्र लिहून निवड चाचणी घेण्याची केली विनंती
 

राज किशोर

Aug 08,2019 09:15:00 AM IST

नवी दिल्ली - सहा वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोमला विना निवड चाचणी विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. राज्यसभा खासदार मेरी कोमने बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाला पत्र लिहून निवड चाचणी घेऊ नये, असे म्हटले. चाचणीत सहभागी होणाऱ्या दोन खेळाडूंना तिने मेमध्ये झालेल्या इंडिया ओपनमध्ये हरवले आहे. तिचे मागील प्रदर्शन चांगले राहिले. अशात निवड चाचणी घेणे योग्य नाही, असे मेरी कोमने म्हटले. फेडरेशनने मेरी कोमचे म्हणणे योग्य ठरवत तिच्या गटात निवड चाचणी न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ५१ किलो वजन गटात इतर खेळाडू निखत जरीनला चाचणी वेळी आल्यावरदेखील उतरू दिले नाही. विश्व चॅम्पियनशिपसाठी ६ ते ८ ऑगस्टदरम्यान दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये चाचणी सुरू आहे. चॅम्पियनशिपचे सामने ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान रशियात होतील.

२०१६ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळले, आज युवा कशी? : जरीन
एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेत्या २३ वर्षीय निखत जरीनने फेडरेशनला पत्र लिहून म्हटले की, ‘मला आश्वासन दिले होते, माझी चाचणी बुधवारी घेतली जाईल. मात्र, आज माझ्या गटातील सामने घेतले नाहीत. मंगळवारी माझा सामना वानलालशी होणार होता.’ निखतने फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, “आज सामना सुरू होण्यापूर्वी निवड समितीच्या अध्यक्षांनी म्हटले, तुझा सामना होणार नाही.’ मी या निर्णयामुळे आर्श्चचकित झाले. कारण मी २०१६ मध्येदेखील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाले होते. मी तेव्हापासून सहभागी होण्यासाठी तयारी करत आहे, तर २०१९ मध्ये का नाही? मी निश्चित पहिल्यापेक्षा आता अधिक युवा नाही. अशात मला बाहेर करण्यासाठी युवा असल्याचे कारण होऊ शकत नाही. २०१६ मध्ये निखत जरीन ५४ किलो गटात उतरली होती व क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली होती. निखतने लिहिले की, मी चाचणी योग्य प्रकारे घेण्याची मागणी करते. आमच्या सर्वांसाठी नियम असतील तर ते लागू केले पाहिजेत.

७५ किलो गटातील चॅम्पियन भाग्यवती चाचणीत पराभूत होत बाहेर

मेमध्ये गुवाहाटी येथे झालेल्या इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत मेरी कोमने निखतला ४-१ ने आणि फायनलमध्ये वानलालला ५-० ने पराभूत केले. त्यामुळे तिने चाचणी न घेण्याचे म्हटले. दुसरीकडे इंडिया ओपनमध्ये ७५ किलो वजन गटात भाग्यवतीने सुवर्ण जिंकले होते, मात्र बुधवारी ती चाचणीत पराभूत होत बाहेर झाली. तिला पूजाराणीने हरवले. पूजाराणी इंडिया ओपनमध्ये पहिल्या फेरीत पूजाकडून पराभूत झाली होती. स्वीटीने या गटात इतर एका सामन्यात पूजाला हरवले. पूजा इंडिया ओपनची रौप्य विजेती आहे. गुरुवारी स्वीटी आणि पूजाराणी यांच्यातील विजेत्याला विश्व चॅम्पियनशिपचे तिकीट मिळेल.

पाच गटांतील खेळाडू निश्चित, पाच गटांतील आज होणार :

५१ किलो गटात मेरी कोम आणि ६९ किलो गटात लवलीनाचे नाव निश्चित झाले. ५४ किलो गटात जमुना बोरोने शिक्षाला, ८१ किलो गटात नंदिनीने लालफकमावीला आणि ८१ किलो वरील गटात कविता चहलने नेहाला पराभूत करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. ४८ किलो, ५४ किलो, ५७ किलो, ६० किलो आणि ७५ िकलो गटातील खेळाडू गुरुवारी निश्चित होतील.

X
COMMENT