आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२००-१५०० फूट खोल बोअर घेऊनही जमिनी मात्र काेरड्याच; केलेल्या खर्चाचा आता कर्जाच्या रूपात डोंगर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिधाेरा हे नागपूरपासून ६० किमीवर असलेले काटाेल तालुक्यातील गाव. येथील संत्रा अन् मोसंबीच्या बागा दुष्काळाच्या दाहकतेत जळून खाक झाल्या आहेत. गरीब शेतकऱ्यांची पिके त्यांच्या डाेळ्यादेखत करपत आहेत. सधन शेतकरी मात्र बाेअरवर ५-६ लाख रुपये खर्च करून पिके वाचवण्यासाठी धडपडत आहेत. १२०० ते १५०० फूट खाेल गेल्यावरही ९०% बाेअर फेल जात असल्याने संत्रा-माेसंबी वाचवण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी हाेत असल्याचे चित्र काटाेल तालुक्यात सर्वत्र आहे. 

 

रिधाेरा परिसरातील सावली खुर्द, वांदळी बु., घारतवाडी, खुरांबा, लिंगा आणि चारगाव परिसरात भीषण परिस्थिती आहे. पाण्याअभावी परिसरातील सुमारे १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बागा वाळून गेल्या आहेत. या गावांत ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचेही संकट आहे. परिसरातील ग्रामस्थांना ४ ते ५ दिवसांआड काही मिनिटांसाठी नळ येतात. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ घेतले तरच पिण्याचे पाणी मिळते. सर्वच व्यवसायांवर दुष्काळाचा माेठा परिणाम झाला आहे. परिसरातील जाम नदी प्रकल्पावरील पंच-धार धरणही पूर्णपणे कोरडेठाक झाले आहे. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचीही प्रचंड टंचाई आहे. पंचधारा धरणावर भेटलेल्या गजानन शिंदे, महेश कळसकर या शेतकऱ्यांनी धरणाचा परिसराला काहीही फायदा नसल्याचे सांगितलेे. केवळ जनावरे धुण्यासाठी धरणातील मृतसाठ्याचा वापर हाेत असल्याचे ते म्हणाले. 


केलेल्या खर्चाचा आता कर्जाच्या रूपात डोंगर: 
रिधाेऱ्यातील सधन शेतकरी विठ्ठल ठाकरे म्हणाले, ‘१० ते १२ वर्षे बाग तयार करण्यास लागले. पण यंदा काही हाताला लागले नाही. पाण्याअभावी बाग करपली. विहिरींनीही तळ गाठला. जनावरांचेही हाल आहेत.’ रमेश वाघ म्हणाले, ‘शेती आहे, तरी रिक्षा चालवून चरितार्थ चालवावा लागतोय. शेतीतून काही उत्पन्न आले नाही. शेतातील २०० झाडे बकऱ्यांनी खाल्ली, तर उरलेली उन्हाने करपून गेली. पीकपाण्यासाठी केलेला खर्चच आता कर्ज म्हणून फेडावा लागणार आहे.’ 


गडकरींच्या गावात प्रतिचंद्रभागा आटली : 
धापेवाडा हे नागपूरपासून ३५ किमीवरील गाव. या गावाची आणखी एक आेळख म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे गाव. याशिवाय विदर्भाचे पंढरपूर म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात प्रतिचंद्रभागा म्हटली जाणारी नदी आहे. मात्र ती आता कोरडीठाक पडली आहे. शेतकऱ्यांच्या हातातून पिके गेलीय. गेल्या वर्षीपेक्षा अर्धेही उत्पन्न हातात आले नाही. साेयाबीन, कापूस, तूर, मका ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. खुद्द नितीन गडकरी यांचीही शेती या गावात आहे. त्यांनाही गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पन्न झाल्याचे त्यांच्या वाड्यावर काम करणाऱ्या अनंता टेंभेकर या युवकाने सांगितले. झुनकी, सावळी, वराेडा आणि अदासा गावांतही दुष्काळाच्या झळा लाेकांना बसल्या आहेत.

 

काटाेल तालुक्यात जलयुक्तची कामे, माेदींनी केले कौतुक 
जलयुक्त शिवार अभियानातील कामासाठी २०१५-१६ मध्ये काटाेल तालुक्याला गाैरवण्यात आले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही या कामांचे काैतुक केले हाेते. यंदा या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील दुष्काळी तीन तालुक्यांपैकी काटाेल एक आहे. अनेक भागात कामे झालेली नसताना कामाचे खाेटे सादरीकरण केल्याचेही पुढे आले आहे.


नरखेड तालुक्यात  पाण्यासाठी पायपीट 
नरखेड तालुक्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही पायपीट करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही माेठा प्रश्न आहे. साेयाबीन, कपाशीसारखी पिके साेडून द्यावी लागली. रब्बी हंगामात ५ टक्केच पेरणी झाल्याचा अंदाज आहे. कमी पावसामुळे सरकारने या तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, काेणाला काहीही फायदा झाला नाही. काटाेल येथील जाम व वर्धा जिल्ह्यातील कार प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी यायचे. पण यंदा प्रकल्प भरले नसल्याने पाणीच मिळालेले नाही.
 

बातम्या आणखी आहेत...