आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छा तेथे मार्ग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका लेखकाच्या आत्मचरित्रात गावाकडच्या माहितीवरून माझ्या मनातील स्मृती जाग्या झाल्या. त्यावरून एक जुना प्रसंग आठवला. माझ्या गावापासून जवळच मामा नोकरीस होते. एकदा त्यांनी बैलगाडीवाल्याजवळ निरोप देऊन आम्हा मुलांना येण्यास सांगितले. दुस-या दिवशी शाळेस सुटी असल्याने मी आणि एक मुलगा दोघेही त्या बैलगाडीत बसून मामाच्या गावी गेलो. दुस-या दिवशी खूपच पाऊस झाला. त्या गावाला तिन्ही बाजूंनी पुराने वेढले होते. तो दिवस कसाबसा गेला. तिस-या दिवशीही पाऊस थांबण्यास तयार नव्हता. पूरही ओसरत नव्हता. त्या दिवसाची शाळा बुडाली. चौथ्या दिवशी सकाळी पाहतो तर पाऊस थांबलेला होता; परंतु पूर मात्र ओसरला नव्हता. आमच्या सिद्धेश्वर शाळेचा धाक सर्व विद्यार्थ्यांत खूप असायचा. शिवाय दहावीचे वर्ष होते. मी मामाला म्हणालो, आम्हाला दुस-या कोणत्या मार्गाने जाता येणार नाही का? ते काही बोलले नाहीत. बाहेर गेले आणि थोड्या वेळाने एका माणसाला घेऊन आले. मला म्हणाले, हे तुम्हाला सिंदफणा नदीच्या पुरातून पलीकडे सांगडीवरून नेऊन सोडतील. जाता येईल का? मी हिंमत करून म्हणालो, हां, काय झालं न जायला? मला तर पोहता येते. पण दुसरा मुलगा काही केल्या तयार होईना. तो घाबरत होता. मी अगोदर जातो म्हणाल्यावर मात्र तो कसाबसा तयार झाला. आमचे कपडे आणि पिशवी डोक्यावर बांधली आणि माझ्या कमरेला भोपळा बांधला. त्या माणसाने पुरात उडी मारली. मी त्याच्या कमरेच्या दोरीला धरून ठेवले होते. अर्ध्या नदीत गेल्यावर मात्र मला चोहीकडे पाणीच पाणी दिसू लागले. तेवढ्यात त्या माणसाने विचारले ‘भ्या, वाटत नाही ना!’ मी मनातनं भ्यालेला होतो, पण मी नाही नाही म्हणालो. त्यावर हां, भ्यायचं नाही, असं म्हणून मला पुन्हा धीर दिला. परत येऊन त्याने दुस-या मुलालाही पलीकडे नेऊन सोडले होते. त्या मुलाने डोळे गच्च मिटून घेतलेले होते. ध्येय समोर असेल तर येणा-या प्रसंगावर मात क रू शकतो. इच्छाशक्ती तितकी तीव्र हवी!