Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | There was no discussion with Raj Thackeray; Says Pawar 

राज ठाकरेंसोबत कुठलीही चर्चा झाली नाही; पवारांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 09:24 AM IST

पवार म्हणाले, निवडणूक निकालानंतरच दिल्लीत सर्व पक्षांची एकजुटीबाबत चर्चा होईल.

 • There was no discussion with Raj Thackeray; Says Pawar 

  सांगोला- माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबद्दल एक ते दोन दिवसांत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे शनिवारी व्यक्त केले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरित चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या राज्य प्रमुखांवर ही जबाबदारी सोपवली आहे. यावर अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष येत्या ८ दिवसांत निर्णय घेईल. त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे पवारांनी सांगून राज ठाकरेंबरोबर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

  गडकरींची चिंता वाटते
  पवार म्हणाले, ज्या पक्षांचे ज्या राज्यात प्राबल्य आहे त्या पक्षप्रमुखाबरोबर इतर सहकारी पक्षांनी जागावाटपाबाबत चर्चा करण्याचे ठरले आहे. निवडणूक निकालानंतरच दिल्लीत सर्व पक्षांची एकजुटीबाबत चर्चा होईल. आगामी लोकसभेसाठी मोदींऐवजी गडकरींचे नाव पुढे केले जात आहे, यावर पवार म्हणाले, गडकरी माझे विधिमंडळातील मित्र आहेत. त्यांचे नाव पुढे केल्याने मला त्यांची काळजी वाटते, असे पवार मिश्कीलपणे म्हणाले.

  भाजपच्या मंत्र्यांनी माझी काळजी करू नये
  'माढ्यातून लोकसभा लढण्याबाबत मला खासदार विजयसिंह मोहिते, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विनंती केली आहे. पण मला या मतदारसंघात उभे राहू नये म्हणून भाजपचे मंत्री सांगत आहेत. मात्र, माझ्या प्रकृतीची काळजी करू नये, असा टोला त्यांनी चंद्रकात पाटील यांना लगावला.

Trending