maharashtra local news / सोने चोरायला आले पण सीसीटीव्हीच चोरुन नेले, जेऊरमध्ये घडला प्रकार

चोरांचा तीन दुकानात चोरी करण्याचा डाव होता

वृत्तसंस्था

Jul 21,2019 09:19:00 AM IST

करमाळा- बोलेरो गाडीत सोन्याचे दुकान लुटण्यासाठी आले आणि दुकानात सोन्याचा माल नसल्यामुळे दोन दुकानातून सीसीटीव्हीवरच चोरांना समाधान मानावे लागले आहे. ही घटना जेऊर (ता. करमाळा) येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरांचा तीन दुकानात चोरी करण्याचा डाव होता. अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात पेट्रोलिंगसाठी वाहन येत नसल्याची तक्रार दुकान मालकाने केली आहे. याबाबत गणेश भास्कर पंडित (वय ४४, रा. जेऊर, ता. करमाळा) यांनी तक्रार दिली.


याबाबत अधिक माहिती अशी : नेहमीप्रमाणे सराफ बाजारातील सर्व दुकानदार दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी पहाटे एक ते तीनच्या सुमारास जेऊर येथील सराफा बाजारातील पंडित यांचे सदगुरू कृपा ज्वेलर्स, राजकुमार राठोड यांचे आर. राठोड ज्वेलर्स आणि शीतल शहाणे यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स बंद असताना बाहेरील बाजूचे कुलूप तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला. दुकान मालकांनी सोने दुकान बंद करते वेळी दुसरीकडे ठेवल्याने चोरांना सोने मिळालेच नाही. बोलेरो गाडीत आलेल्या अनोळखी पाच ते सहा चोरांच्या हाती इतरही महत्त्वाचे असे काहीच लागले नाही. पण जाता जाता त्या चोरांनी दुकानात असलेल्या सीसीटीव्हीच्या सामानावर डल्ला मारला. दोन ठिकाणचे सीसीटीव्हीचे सामान उचलून नेले आहे. यानंतर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असून बाजूला असलेल्या दुकानातून सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत.

X
COMMENT