आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stranded Police Jeep For Passenger Comprehension; Make Sure The Bike Is Stolen To The Rescue

प्रवासी समजून वाटमारीसाठी अडवली पोलिसांची जीप; बचावासाठी दुचाकी चोरीला गेल्याचा बनाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - रिक्षा अडवून चाकूने हल्ला करत लूट केल्यानंतर चोरट्यांनी प्रवासी समजून गस्तीवर असलेल्या पोलिसांचीच जीप अडवली. जीपमधून प्रवाशांऐवजी पोलिस उतरल्याचे पाहून चोरांना पळता भुई थोडी झाली. यात त्यांचा अपघातही झाला. मात्र, अंधाराचा फायदा घेत दुचाकी सोडून ते पसार झाले. मात्र, प्रकरणातून बचावासाठी एका चोरट्याने सकाळीच पोलिस ठाणे गाठले अन् दुचाकी चोरीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाणाक्ष पोलिसांमुळे प्रकरण उघडकीस आले. दोघांना पोलिसांनी अटक केली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी- जातेगाव रस्त्यावर मंगळवारी पहाटे ३ वाजता हा थरार झाला. 

धारूर तालुक्यातील संगम येथील गणेश दत्तात्रय होरमाळे हे मिथून ज्ञानोबा कांबळे याच्यासमवेत शौचालय बांधकामासाठी लागणाऱ्या टॉयलेटचे साहित्य आणण्यासाठी रिक्षातून गढीला आले होते. परत जाताना त्यांचा रिक्षा भेंड फाट्याजवळ आला तेव्हा दुचाकी अाडवी लावून तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या हातावर व पायावर चाकूहल्ला करून जखमी केले. त्यांच्याकडील एक मोबाइल व रोख ६ हजार रुपये काढून घेतले. आणि यानंतर पोबारा केला होता. 

मध्यरात्री १० किमीपर्यंत केला पाठलाग
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी फेकून मारलेली काठी एकाला लागली. दुचाकीवरून पळणाऱ्या चोरट्यांचा जीपमधून पाठलाग सुरू केला. १० किमीपर्यंत हा  पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सेलू शिवारात दुचाकी घसरून तिन्ही चोरटे खाली पडले अन् पळून गेले.
 

दुचाकीचोरीचा बनाव 
सेलू शिवारात तलवाडा पोलिसांना दुचाकी, एक मफलर आढळून आली. दुचाकीवरून पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीने चोराने नामी शक्कल लढवली. एक जण सकाळी ६ वाजताच दुचाकीचोरीची तक्रार देण्यासाठी गेवराई ठाण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच सिरसदेवी परिसरात वाटमारी तसेच पोलिसांच्या गाडीला चोरट्यांनी रोखल्याची माहिती सहायक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी गेवराई पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तक्रारदाराची उलटतपासणी केली.  शिवाय त्याचे शर्ट काढून पाहिले तेव्हा पाठीवर काठीचे व्रण उमटलेले दिसले. त्यावरून फिर्यादीच चोर असल्याचे स्पष्ट झाले.
 

पोलिसांना पाहताच चोरट्यांची पाचावर धारण बसली
या लुटीनंतर चोरटे सिरसदेवीजवळ दबा धरून बसले होते. भेंड खुर्दजवळ लुटमारीच्या घटना वाढल्याने तलवाडा पोलिस तेथे निगराणी ठेवून असतात.  सहायक निरीक्षक सुरेश उनवणे व कर्मचारी गस्त घालत अर्धमसला येथे पोहोचले. तिथे त्यांना रिक्षाचालकाच्या लुटीची माहिती मिळाली. जीपचा अंबरदिवा बंद करून ते सिरसदेवीकडे निघाले. या वेळी दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी प्रवासी समजून पोलिसांच्याच जीपला दुचाकी आडवी लावून दमदाटीचा प्रयत्न केला. सहायक निरीक्षक उनवणे व कर्मचारी जीपमधून उतरताच खाकी वर्दी, काठ्या पाहून चोरट्यांची पाचावर धारण बसली. चोरट्यांनी दुचाकीने पोबारा केला.
 

वाटमारीचे इतरही आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
तिन्ही चोरट्यांनी रुमाल बांधून चेहरे झाकलेले होते. रिक्षावाल्याला लुटल्यानंतर प्रवासी समजून पोलिसांचीच गाडी अडवणारे हे तिघेही अट्टल गुन्हेगार असावेत, असा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखा तसेच दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी-कर्मचारी गेवराईत पोहोचले. त्यांनी तक्रारदार बनून आलेल्या चोरट्याची कसून चौकशी केली. त्याने इतर दोघांची नावे सांगितली. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तलवाडा ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम  सुरू होते. या आरोपींकडून  वाटमारीचे गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.