आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थनगरात दुपारी दीडला घरफोडी आठ मिनिटांत ५० तोळे सोने लंपास, चोरटे माहितगार असल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पतीच्या निधनानंतर एकटेपणा वाटू नये म्हणून गजबजलेल्या समर्थनगरात राहण्यासाठी आलेल्या सुनीता धर्मेंद्र पुराणिक (३८) यांच्या घरात सोमवारी भरदुपारी दीड वाजता आठ मिनिटांत घरफोडी झाली. दुचाकीवर आलेल्या दोन चाेरट्यांनी बंद फ्लॅटचे लॅचलॉक तोडून थेट बेडरूममधील कपाट उचकटले. त्यातून ५० तोळे सोने आणि मुलाच्या शिकवणीसाठी आणलेले एक लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले. क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांच्या प्रतिमा सीसीटीव्हीने अचूक टिपल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने चोरटे आले आणि त्यापैकी एकाने थेट घरात घुसून कपाट उचकले त्यामुळे दोघेही माहीतगार असल्याचा संशय आहे. 

 

समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्र.५ मध्ये राहत असलेल्या सुनीता पुराणिक अजिंठा अर्बन बँकेच्या जाधवमंडी शाखेत नोकरी करतात. सुनीता यांचा दहावीत शिकणारा मुलगा वरद दुपारी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ आईला कळवले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहून क्रांती चौक ठाण्याचे पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनीता यांच्या पतीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. 

 

सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे बँकेत गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा वरद दहावीच्या शिकवणीसाठी आणि मुलगी शाळेत गेली होती. दुपारी दीड वाजता क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोरील चौकातून दुचाकीवर आलेले चोरटे अपार्टमेंटपासून काही अंतरावर थांबले. तेथून चष्मा असलेला चोरटा पायी अपार्टमेंटपर्यंत आला. तर दुचाकीस्वार चोरटा अपार्टमेंटच्या खाली थांबला. यानंतर अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या चोराने मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून आत शिरला. वन बीएचके फ्लॅटमध्ये शिरल्यावर त्याने थेट कपाट उचकटले. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये पन्नास तोळे सोने आणि एक लाखाची रोकड असलेली लाल रंगाची बॅग घेतली. तेवढ्यात अपार्टमेंटखाली उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने इशारा करताच चष्मा घातलेला चोरटा धावतच अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरला. यानंतर दोघेही दुचाकीवर बसून आलेल्या मार्गाने पसार झाले. 

 

व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये एकूण सहा फ्लॅट आहेत. त्यापैकी पहिल्या मजल्यावर एक तर दुसऱ्या मजल्यावर दोन व तिसऱ्या मजल्यावर तीन फ्लॅट आहेत. दुपारी पुराणिक यांचा मुलगा वरद हा घरी परतला. या वेळी चोरटा घरात शिरलेला होता. वरदला पाहून अपार्टमेंटखाली असलेल्या दुचाकीस्वार चोराने सांकेतिक इशारा केला. त्यामुळे फ्लॅटमधील चोरटा दागिने आणि पैशांची बॅग घेऊन लगेचच खाली उतरू लागला. तेव्हा वरद आणि चोरटा दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्यावर समोरासमोर आले. पण याच चोराने आपले घर फोडल्याचे वरदला माहिती नव्हते. यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. तर वरद घरात गेल्यानंतर त्याला कपाट उचकटलेले दिसून आले. त्यामुळे त्याने घाईघाईने सुनीता यांना फोन करून घर फोडल्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अनिल आडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे हे पथकासह दाखल झाले. विशेष पोलिस अधिकारी सुधीर जाधव, माउली सोळंके यांनी पुराणिक कुटुंबीयांना आधार दिला. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना या वेळी पाचारण करण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा चोरांनी आठ मिनिटात घर फोडून दागिने आणि रोकड लांबवल्याचे निदर्शनास आले. परिसरातील रहिवासी अमित भांगे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे येताना-जाताना कैद झाले. हे चोरटे क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोरील चौकाकडून आले आणि त्याच मार्गे निघून गेले. पण घटनास्थळी आलेला श्वान चोरांच्या अगदी विरुद्ध दिशेला म्हणजे वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दिशेने गेला. 

 

सीसीटीव्ही बसवण्याची तयारी 
तीन मजली अपार्टमेंटमध्ये यापूर्वीही चोरी झाली होती. मात्र सहा घरांपैकी भाडेकरू राहतात. त्यामुळे सोसायटीकडे दुर्लक्ष असल्याचे या अपार्टमेंटमधील रहिवासी नंदिनी ओपळकर यांनी सांगितले. सध्या केवळ साफसफाईसाठी कर्मचारी आहेत. वॉचमन मात्र नाहीत. यापुढे सर्वांनी एकत्र येऊन या भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी आणि वॉचमन ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे ओपळकर यांनी सांगितले. 
 

पुराणिक यांनी ओळखली बॅग..
अपार्टमेंटमधून दुचाकीवर पसार होताना चोरांनी दोघांच्या मध्ये लाल रंगाची दागिने आणि रोख असलेली बॅग ठेवली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दोघांचे फुटेज सुनीता यांना पोलिसांनी दाखवले. तेव्हा त्यांनी लाल रंगाची बॅग त्यांचीच असल्याचे पोलिसांना सांगितले. 

 

सोने, पैसे आणल्याचा सुगावा कसा लागला ? 
व्यंकटेश अपार्टमेंट समर्थनगरसारख्या गजबजलेल्या भागात असले तरीही तिथे ६ फ्लॅट असून ५ भाडेकरू आहेत. पुराणिक कुटुंबीयांच्या फ्लॅटमध्ये दुपारी कुणीही नसते. हे चोरट्यांना माहीत असावे. चोरट्यांनी थेट बेडरूममधील कपाट उचकले आणि सोने व रोख रक्कम पळवली. त्यामुळे पुराणिक यांनी सोने व पैसे आणल्याचा सुगावा चोरट्यांना कसा लागला हे रहस्य असून चोरटे माहीतगारांपैकी असावेत, असा संशय आहे. 


मुलाच्या शिकवणीच्या फीसाठी आणले होते एक लाख रुपये 
पुराणिक या अजिंठा अर्बन बँकेत काम करतात. उस्मानपुरा येथील शाखेत त्यांचे खाते आहे, मात्र बँकेचे शिफ्टिंग चालू असल्यामुळे त्यांनी बँकेतून सोने घरी आणले होते. तर मुलाच्या शिकवणीची फीस भरायची असल्यामुळे एक लाख रुपये घरात आणून ठेवले होते, असे सुनीता पुराणिक यांनी सांगितले. 


आठ दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये आले होते राहायला 
पुराणिक या आठ दिवसांपूर्वीच व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापूर्वी कलाश्रीमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. पतीचे निधन झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत त्यांनी तीनदा घर बदलले होते. व्यंकटेश अपार्टमेंटच्या परिसरात वर्दळ असल्याने या ठिकाणी घर घेतले होते. एकटेपणा वाटू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. 


 

 

बातम्या आणखी आहेत...