आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीनंतर 400 सीसी बाईकने काही तासांत ठोकायचे 'धूम'; गजानन महाराज मंदिरातील चांदीचा मुद्देमाल ताब्यात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चोरी करण्यासाठी पुण्याहून सहा जणांची टोळी ४०० सीसीच्या बाईकवरून सोलापुरात आली. दिवसभर सोरेगाव, कुमठे, सैफुल, बाळे या भागात पाहणी केली. सोलापुरात दिवसभर रेकी केली. एका हॉटेलमध्ये जेवण केले. सोरेगावातील गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्लॅन ठरला. एका शेतामध्ये दुचाकी लावून झोपले. मध्यरात्रीच्या सुमाराला मंदिराचा दरवाजा उघडून देवाच्या डोक्यावरील चांदीचे छत्र, पादुका, दानपेटीतील पैसे पळवले. चार ठिकाणी घरेही फोडली अन् थेट विजापूरला गेले. तिथून पुणे गाठले. ही कथा कुठल्या चित्रपटातील नाही तर सोलापुरातील घडलेल्या चोरीची आहे. १६ जानेवारी रोजी गजानन महाराज मंदिरात चोरी झाली होती. ती चोरी विजापूर नाका पोलिस गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणली आहे. 

 

संदीप सत्यवान नानावत (वय २१, रा. चिखली रोड, स्पाईन रस्ता, तालुका हवेली, जिल्हा पुणे), करण भगत शेखावत (वय १९, रा. कुसेगाव, ता. दौंड, पुणे) या दोघांना अटक झाली. हे दोघे चोरीच्या इराद्याने पुन्हा येथे आले होते. त्यांच्या चौघा साथीदारांचा शोध सुरू आहे. दोन दुचाकी, चांदीचे छत्र, पादुका असा ऐवज जप्त करण्यात आला. हे सहा जणही सराईत गुन्हेगार आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 

 

सोलापुरात जेवण केले, कटर घेतले 
चोरी करण्याच्या अगोदर एका हॉटेलात जेवण केले. कटर कुठे मिळतो? याची माहिती घेतली आणि दुकानातून कटरही घेतले. चोरी करण्यासाठी सोरेगाव परिसरात फिरत राहिले. मध्यरात्री कुमठे येथील माने यांच्या दुकानात चोरी केली. तेथून सोरेगाव येथील गजानन महाराज मंदिरात चोरी केली. तसेच सीसीटीव्हीचा डाटा काढून घेतला. कटरच्या साह्याने दरवाजा उचकटून मंदिरात छत्र आणि पादुका चोरून नेले. सुमारे तीन किलो चांदीचे दागिने होते. त्यानंतर सैफुलमध्ये चोरी केली. ज्या शेतात थांबले होते, तेथून दुचाकी घेऊन पुन्हा विजापूरच्या दिशेने गेले. याठिकाणी काही कागदपत्रे व चोरीचे साहित्य पडले होते. त्यावरून पोलिसांनी माग काढला आणि चोरापर्यंत गेले, अशी माहिती फौजदार सचिन बनकर यांनी दिली. 

 

चोऱ्या करण्यात तरबेज, रेसर गाड्यांवर करायची मौजमजा 
सहाही संशयित चोरी करण्यामध्ये तरबेज आहेत. कुठल्याही शहरात फिरण्यासाठी खास त्यांच्याकडे दुचाकी आहेत. संधी मिळाली की चोरी करतात. सगळे तरुण २० ते ३० वयोगटातील आहेत. अडीच ते तीन तासांमध्ये पुण्याहून सोलापूरला आले. जाताना विजापूरमार्गे पुण्याला गेले. अन्य चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक कैलास काळे, फौजदार बनकर यांच्यासह राजकुमार तोळणुरे, दिलीप भालशंकर, प्रकाश निकम, आयाज बागलकोटे, इम्रान जमादार, अंबादास गड्डम, शिवानंद भीमदे, राहुल वाघमारे, अनिल गावसाने, पिंटू जाधव, दत्ता काटे, विनोद व्हटकर या पथकाने केली. 

 

नागरिकांनो, सीसीटीव्ही लावा 
मंदिरातील चोरी आमच्या पथकाने उघडकीस आणली आहे. दुकाने, मुख्य रस्ते, मंदिर ठिकाण या परिसरात सीसीटीव्ही लावून घ्यावेत. यामुळे आपली सुरक्षाही वाढते, असे आवाहन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले. गुन्हा उकल केलेल्या पोलिसांना योग्य बक्षीस दिले जाईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...