आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडला दोन दुकाने फोडली; अडीच लाख रुपयांची रक्कम लांबवली, चोरटे सीसीटीव्हीत कैद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शहरातील नवा मोंढा भागात शनिवारी भल्या पहाटे चोरट्यांनी दोन दुकाने फोडून रोख अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. या चोरीमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. 


जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांना ऊत आला असून चोरी, वाटमारी, मोबाइल चोरी, अवैध वाळू वाहतूक आदी घटना वारंवार घडत आहेत. माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनीही या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करून शासकीय अधिकारी, पोलिस आणि राजकीय नेते यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. त्याला पुष्टी देणाऱ्या घटना वारंवार घडत आहे. शनिवारी भल्या पहाटे तीन-चार वाजताच्या सुमाराला नवा मोंढा भागातील वसुंधरा फर्टिलायझर्स व वसुंधरा सीड्स अँड अॅग्रो केमिकल्स ही दोन दुकाने चोरट्यांनी फोडली.

 
अण्णाभाऊ साठे चौकातील मुख्य रस्त्याच्या जवळच ही दोन्ही दुकाने आहे. दिनेश बनारसीदास अग्रवाल व संजय बनारसीदास अग्रवाल या दोन भावांची ही दुकाने आहे. चोरट्यांनी सकाळी दोन्ही दुकानाचे शटर गजाळीने वाकवून दुकानात प्रवेश केला.


दुकानातील गल्ल्यात असलेली रोख रक्कम घेऊन पोबारा केला. अवघ्या दीड मिनिटात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. चोरट्यांची ही करामत सीसीटीव्ही मध्येही कैद झाली आहे. वसुंधरा सीड‌्स अँड अॅग्रो केमिकल्समधून चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपये तर वसुंधरा फर्टिलायझर्स मधून ७० हजार रुपये अशी अडीच लाख रुपयांची चोरी झाली.