आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मारला डल्ला, ६ लाखांचा ऐवज केला लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - कुटुंब बाहेरगावी गेल्याचे हेरून चोरट्यांनी होलसेल किराणा दुकानदाराच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटासह बेडमध्ये असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ११ ते १२ जून रोजीच्या रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी ठाणे अंमलदार उद्धव चव्हाण यांनी सांगितले की, अंबड शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणारे व्यापारी सोहनलाल लालचंद राठी यांची त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरच गोपाल ट्रेडिंग कंपनी नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. त्यांच्या घरात सोहनलाल राठी, त्यांची पत्नी गंगाबाई राठी असे दोघेच राहतात. ते दोघेही ११ जून रोजी सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथे त्यांच्या नातेवाइकांच्या लग्ना समारंभासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते दुसऱ्या दिवशी १२ जून रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घरी परत आले. तेव्हा त्यांचे वरचे मजल्यावरील घराचे समोरील दाराचे कुलूप दिसले नाही व दरवाजा आतून लावलेला दिसला. त्यावर त्यांनी त्यांचा पुतण्या केदार याला फोन करून बोलावून घेऊन त्यांनी घराच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर घराचा पाठीमागील दरवाजा उघडा  दिसला.  त्यांनी अंबड पोलिसांना फोनवर माहिती दिल्यानंतर पोलिसही त्याठिकाणी गेले.  बेडरूमच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटलेला, कपाटातील, बेडमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. याप्रकरणी सोहनलाल लालचंद राठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ हे करत आहेत. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, शैलेश शेजूळ, सुग्रीव चाटे, शेळके, जमादार शहाजी पाचारणे, हर्षवर्धन मोरे, के. बी. दाभाडे, वंदन पवार, महेंद्र गायके,  संतोष हावळे, संदीप जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 
 

हा गेला मुद्देमाल 
बेडमधील जर्मनच्या डब्यातील २ लाख ७० हजार रुपये,  १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार तोळ्यांच्या बांगड्या, ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या  अंगठ्या, १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५ तोळे सोन्याचे नेकलेस असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल आहे. 
 

पथक रवाना
या चोरट्यांचा पोलिस तपास करीत असून सीसीटीव्ही  फुटेज तपासत आहोत. लवकरच सदरची चोरी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी एक पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आहे. 
-अनिरुध्द नांदेडकर, पोलिस निरीक्षक