आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे घराण्यातील तिसऱ्या व्यंगचित्रकाराचा राजकारणात प्रवेश; अमित ठाकरे मनसे नेतेपदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शैक्षणिक धोरणाचा ठरावही मांडला; आई, पत्नी, बहीण आजीसह कुटुंबाची हजेरी
  • शिवमुद्रा असलेला नवा ध्वज; सरकारवर वचक ठेवण्यासाठी 'शॅडो कॅबिनेट'

​​​​​मुंबई : जगविख्यात व्यंगचित्रकार तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता आणखी एक व्यंगचित्रकार आणि ठाकरे घराण्यातील पाती अमित ठाकरे यांचा अखेर गुरुवारी सक्रिय राजकारणात विधिवत प्रवेश झाला. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात अमित यांची नेतेपदी निवड करण्यात आली. पहिल्याच सत्रात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडताच तो एकमताने मंजूर करण्यात आला. निवड झाल्यानंतर अिमत यांनी शैक्षणिक धोरणाचा ठराव मांडला.

मनसे आपला झेंडा बदलणार असून हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने मनसेच्या नव्या झेंड्यासह १५ दिवस अगोदरच दिले होते ते खरे ठरले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले आणि मनसेच्या नव्या ध्वजाचे अनावरणही केले. यानिमित्ताने आकर्षक कार्यक्रमही सादर करण्यात आला. शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजमुद्रा तयार केली होती. या राजमुद्रेवर प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। असा उल्लेख होता. याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे असा आहे. 

अमित ठाकरेंना व्यंगचित्रांसोबतच फुटबॉलचीही आवड

२४ मे १९९२ ला जन्मलेले अमित ठाकरे मितभाषी आणि शांत स्वभावाचे आहेत. रूपारेल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कॅनडा येथील वेस्टमिनिस्टर डग्लस कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले आहे. वडील राज यांच्याप्रमाणेच उत्तम व्यंगचित्रकार असून ते उत्तम फुटबॉलही खेळतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी मनसेचा प्रचार केला होता.

आजीची प्रथमच हजेरी

राज ठाकरे यांच्या मातोश्री आणि अमित यांच्या आजी कुंदा ठाकरे यांनी अमितची नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले, दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगले काम करणार आहे, तो खूप मोठा व्हावा असा आशीर्वादही त्यांनी दिला. कुंदा ठाकरे कधीही पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. अमितचे लाँचिग होणार असल्याने त्या उपस्थित राहिल्या होत्या. अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे आणि बहीण ऊर्वशी यांनीही आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पायाखालची जमीन सरकली : अमित

अमित ठाकरे म्हणाले, बुधवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी ठराव मांडावा असे सांगितले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तरी बरे आज सकाळी सांगितले नाही. नाही तर माझे काही खरे नव्हते. पक्षाची स्थापना होऊन १४ वर्षे होत आहेत आणि हे पहिले महाअधिवेशन आहे. मी आजवर कधीही मंचावरून बोललो नाही. २७ वर्षांत पहिल्यांदाच बोलत आहे. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा आहे, असे म्हणून अमित ठाकरे यांनी मंचावर बसून गुडघे टेकून सगळ्यांना नमस्कार केला.

मनसेची 'शॅडो कॅबिनेट' माध्यमांवरच अवलंबून; यापूर्वीच्या शॅडो कॅबिनेटचा बोजवारा

मनसेच्या महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट तयार करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. शॅडो कॅबिनेट म्हणजे विरोधकांचे मंत्रिमंडळ. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष शॅडो कॅबिनेट तयार केले जाते. यात प्रत्येक मंत्र्यामागे एक मंत्री असतो महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मनसे तेवढ्याच मंत्र्यांची शॅडो कॅबिनेटमध्ये निवड केली जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. मात्र, मनसेचा केवळ एकच आमदार असल्याने शॅडो कॅबिनेट माध्यमाद्वारेच सरकारवर अंकुश ठेऊ शकणार आहे.

  • सन २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. मध्य प्रदेशातही काँग्रेसने तत्कालीन भाजप सरकारला लक्ष्य करण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. गोव्यातही हा प्रयोग करण्यात आला होता.
  • केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हा काँग्रेसनेही शॅडो कॅबिनेटचा उपक्रम राबवून शॅडो कॅबिनेटची घोषणा केली, परंतु त्याने काहीही काम केले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही काँग्रेससह विरोधी पक्षांनी शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची घोषणा केली होती, परंतु ती घोषणाच ठरली.