आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतआशीर्वादासाठी दंडवत घालण्याचा ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीने जपला वारसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर जनआशीर्वाद यात्रेवर निघालेले शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचाेरा येथील पहिल्याच मेळाव्यात उपस्थित जनसमुदायासमाेर अक्षरश: नतमस्तक हाेत मतदारांनी आजवर दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले. 

 

यापूर्वी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आैरंगाबाद, ठाण्याच्या मतदारांसमाेर तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात ‘बीकेसी’ मैदानावर आदित्यसह असेच व्यासपीठावरून दंडवत घातले हाेते. मतदारांसमाेरच नतमस्तक हाेण्याचा हा ‘वारसा’ आदित्य ठाकरेंनी कायम ठेवल्याचे गुरुवारी दिसून आले. 

 

‘लोकसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने भरभरुन प्रेम केले त्यांचे आभार मानण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मी मते मागायला आलेलो नाही. मला कोणतेही पद नकोय. ज्यांनी आम्हाला मते दिली नाही, त्यांच्यापर्यंतही मला पोहोचायचे आहे, त्यांनाही मदत करुन त्यांचे मन जिंकायचे आहे. कोणतीही जात, पात, धर्म न पाहता सर्वांवर प्रेम करुन राज्यभर भगवा पोहोचवून राज्य जिंकायचे आहे,’ असे आदित्य म्हणाले.

 

जनआशीर्वाद शुभारंभ गुरुवारी दुपारी पाचोरा येथे करण्यात आला. यावेळी आराेग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार संजय राऊत, गजानन किर्तीकर, माजी मंत्री सुरेश जैन आदी नेतेमंडळी उपस्थित हाेती.


धरणगावातून आदित्य यांनी िनवडणूक लढवावी
उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेचा पहिला आमदार एरंडोलकरांनी दिला. शिवसेनेचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आदित्य ठाकरे यांनी धरणगाव मतदारसंघातून लढवावी, आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ, असे आवाहन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.