आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Bill Is Grant Giving Of Citizenship, Not Grant Taking; Don't Teach The Idea Of India : Shah

हे विधेयक नागरिकत्व देणारे, घेणारे नव्हे; आयडिया ऑफ इंडिया शिकवू नका : शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१९ मांडले. सभागृहात त्यावर सहा तास चर्चा झाली. शहा म्हणाले, हे विधेयक मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार केला जात आहे. जगभरातून आलेल्या मुस्लिमांना भारतात नागरिकत्व मिळावे, असे तुम्हाला वाटते का? भारतातील अल्पसंख्याक व मुस्लिमांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. व्हिसा संपणाऱ्यास बेकायदा मानले जाते. आम्ही त्या गोष्टीला विधेयकात समाविष्ट केले आहे. धार्मिक आधारावर छळ झालेल्यांनाही नागरिकत्व मिळेल. १९५५ च्या कायद्यातील कलम-५ अंतर्गत तरतुदीनुसार भारतात आल्याच्या तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाईल. त्यांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेतून जाण्याची गरज पडणार नाही. या विधेयकामुळे मुस्लिमांचा कोणताही अधिकार काढून घेतलेला नाही. हे नागरिकत्व देण्याचे विधेयक आहे. नागरिकत्व काढून घेण्याचे विधेयक नाही. संभ्रमात अडकू नका. 

या विधेयकाचा भारतातील मुस्लिमांच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही. मला आयडिया ऑफ इंडिया समजावून सांगू नका. मी देखील येथेच जन्माला आलो. माझ्या सात पिढ्याही येथे जन्माला आल्या. मला आयडिया ऑफ इंडियाचा अंदाज आहे. मोदी सरकार संविधानावर विश्वास ठेवणारे आहे. म्हणूनच देश कधीही मुस्लिममुक्त होणार नाही, याची मी खात्री देतो.काँग्रेस नेते आनंद शर्मा त्यावर म्हणाले, विधेयकाबाबत सरकारने राजहट्ट सोडून गांधीजींच्या चष्म्यातून पाहिले पाहिजे. २०१६ मध्येही असे विधेयक आणले गेले होते. ते विधेयक व आताच्या विधेयकात फरक आहे. मी त्याच्याशी सहमत नाही. त्याची पडताळणी व्हावी. सरकार घाईगडबड करत आहे. आम्ही त्यास विरोध करतो. त्यामागे राजकारण नाही. संवैधानिक व नैतिक कारण आहे.

मुस्लिमांची चिंता विरोधकांनी करू नये, हा देश कधीही मुस्लिममुक्त होणार नाही हा विश्वास ठेवा : गृहमंत्री
संसदेत चर्चा सभागृहात गांधी, पटेल, नेहरू व सावरकर यांच्यापासून जिनांपर्यंत चर्चा, जुन्या भाषणांनाही उजाळा
उत्तर : विधेयकाबाबत राजहट्ट सोडावा, गांधीजींच्या चष्म्यातून पाहा : आनंद शर्मा

ईशान्येत हिंसाचार आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, अरुणाचलात निदर्शने तीव्र

छायाचित्र गुवाहाटीचे आहे. काहीचे असेच चित्र संपूर्ण आसाम व ईशान्येकडील इतर राज्यांतही आहे. बुधवारी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर व अरुणाचल प्रदेशात विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने व हिंसाचार झाला. आसामसह १० राज्यांत स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. गुवाहाटीत हजारोंच्या संख्येने लोक सचिवालयासमोर गोळा झाले होेते. त्रिपुरात मोठ्या संख्येने महिलाही घराबाहेर पडल्याचे दिसून आले. लोकांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फोडले.