विधानसभा 2019 / 'आत्ताचे सरकार शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही, मदत न करणारे सरकार परत सत्तेत नको' - शरद पवार

'हा महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जावू देणार नाही' 

प्रतिनिधी

Sep 22,2019 10:16:09 PM IST

सातारा- "आजच्या काळात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही", असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील जाहीर सभेत सरकारला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज त्यांची सातारा येथे जाहीर सभा झाली. यावेळी ते काय बोलणार याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

आज सातारामध्ये तरुणाईकडून त्यांचे भव्य आणि अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. "स्वातंत्र्यानंतर भारतावर पाकिस्तान, बांग्लादेश, चीनकडून हल्ले झाले मात्र या भागातील जन्मलेल्या जवानांनी ते हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते यशवंतराव चव्हाण याच मातीतले त्यामुळे मला माहिती आहे हा जिल्हा विचारांशी प्रतारणा करणार नाही आणि जो करेल त्याला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. आज ती परिस्थिती जन्माला आली आहे ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली, त्यांना धडा शिकवल्या शिवाय आपण स्वस्त बसायचे नाही." असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, "मला सातारकरांना अंतःकरणातून धन्यवाद द्यायचे आहे. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी मोठ्या जल्लोषात माझे स्वागत केले. सातारा जिल्ह्याने नेहमीच देशाच्या हितासाठी काम केले. सातारला स्वातंत्र्य लढ्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी इथे प्राणाची आहुती दिली आहे. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. त्यांनी मुलांना शिकवले एक पिढी घडवली, मात्र आज काय परिस्थिती आहे. मुलं शिकली आहेत मात्र मुलांना रोजगार नाही. मुलांना पाहुणे बघायला येतात मात्र नोकरीच नसल्याने माघारी परततात. या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला, महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा. आता शौर्याचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यात छमछम होणार आहे, हे काय चालले आहे ?" असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला.

"शिवाजी महाराज यांच्या बाबत अख्ख्या जगाला अभिमान आहे. गादीचा अभिमान आहे. पुरंदर किल्ल्याचा तह झाला मिर्झाराजे आले पण छत्रपतींनी किल्ले सोडले नाही. छत्रपतींना दिल्लीत चुकीची वागणूक दिली गेली. आपल्या स्वाभिमानाकरीता महाराज तिथून उठून गेले. दिल्लीत स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून महाराजांनी सहन केले नाही मात्र आज?" हे बरं नव्हं असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी पक्ष बदल केलेल्या लोकांना लगावला.


"तुम्हाला-आम्हाला अभिमान त्या गादीचा आदर आहे. ती छत्रपतींची गादी आहे. महाराष्ट्राला ज्यांने शौर्य शिकवले त्यांची ती गादी आहे, तरी काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. लोकशाही आहे तो त्यांचा अधिकार आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. लोकांना हवं आहे की आम्ही तरुणांच्या पाठी ताकद उभी करावी. आम्ही करणार ! मी 20-20 तास काम करणार परंतु महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हाती देणार नाही," असा विश्वास शरद पवार यांनी महाराष्ट्रातील तरुणांना दिला.

X
COMMENT