हा न्यूझीलंडमधील मशिदींवरील हल्ल्याचा बदला : श्रीलंकेने केला दावा, इसिसचा व्हिडिओ

दिव्य मराठी

Apr 24,2019 09:27:00 AM IST

कोलंबो - श्रीलंकेतील हल्ल्यांची जबाबदारी कट्टर मुस्लिम संघटना ताैहिद जमातने घेतली असून विदेशातील जाळ्याच्या मदतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे श्रीलंकेचे संरक्षणमंत्री रुवान विजयवर्धने यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले, न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील घटनेचा बदला घेण्यासाठी आलेल्या अतिरेक्यांनी श्रीलंकेत चर्च आणि हाॅटेलांना लक्ष्य केले. ख्राइस्टचर्च येथे १५ मार्च रोजी एका माथेफिरूच्या हल्ल्यात दोन मशिदींतील ५० लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्याच्या सुमारे ५६ तासांनंतर अतिरेकी संघटना इसिसनेही त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इसिसने सर्व आठ हल्लेखोरांचे व्हिडिऔ जारी केले आहेत. व्हिडिऔत एक हल्लेखोर इसिसच्या पोशाखात आहे.


मृतांची संख्या आता ३२१ झाली आहे. यात १० भारतीयांसह ३८ विदेशी नागरिक आहेत. ४५ मुलेही मृत झाली. यात ५०० जण जखमी असून पोलिसांनी सिरियाच्या एका नागरिकालाही ताब्यात घेतले असून त्याची चाैकशी सुरू आहे.


श्रीलंकेत बुरखा आणि कर्मठ मदरशांवर बंदीची शक्यता

डेली मिरर या स्थानिक वृत्तपत्रानुसार, एका ठिकाणी बुरखेधारी महिलेने अतिरेकी हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे श्रीलंका सरकार बुरख्यांवर बंदीच्या विचारात आहे. याशिवाय सरकार मदरशांवर कडक नियंत्रण ठेवणार आहे. कर्मठ मदरशांवर बंदी येईल. स्थानिक मुस्लिम समाजाने सरकारच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

> माध्यमातील वृत्तात संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, डेमाटागोडा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात काही महिलांचा सहभाग होता. घरातील छाप्यावेळी झालेल्या आठव्या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाला.


> मुस्लिम कुटुंबे घराबाहेर फलक लावत या घटनेचा निषेध करताहेत. यावर लिहिले आहे की आम्ही सर्वजण दु:खी आहोत. आम्ही सर्वांसोबत आहोत.


> ईस्टर हल्ल्यानंतर सरकारने दोन दिवसांसाठी देशातील सर्व शाळा बंद ठेवल्या होत्या. आता २८ एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


> या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशात सकाळी आठ वाजता तीन मिनिटांचे माैन राखण्यात आले. या काळात श्रीलंकेतील दूतावासांनी आपले ध्वज अर्ध्यावर आणले.

> कोलंबोत एका मुस्लिम मसाला व्यापाऱ्याच्या दोन मुलांनी शांग्रीला आणि सिनमन ग्रँड हाॅटेलात आत्मघाती स्फोट घडवले. त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.


> आतापर्यंत ४० जणांना अटक झाली आहे. यातील २६ जणांवर गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे. सीआयडी चाैकशी सुरू आहे. नऊ जणांना कोर्टासमोर हजर केले आहे. हे सर्वजण एका कारखान्यात कामाला होते. या कारखान्याचा मालकही सुसाइड बाॅम्बर होता.


इसिसचे ५ हजार हस्तक बनलेत जिवंत बाॅम्ब
अमेरिकेची थिंक टँक साॅफन सेंटरनुसार, सिरिया व इराकमध्ये इसिसची पकड सैल झाल्यानंतर ५६०० इसिसचे हस्तक आपल्या ३३ देशांत परतले आहेत. ते इसिसच्या नेतृत्वाच्या संपर्कात असून शक्य तेथे हल्ल्यांसाठी त्यांना उत्तेजन मिळत आहे. हे हस्तक जिवंत बाॅम्ब आहेत, ज्यांचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.


X