आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे अशोक-निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनय नव्हे या हटके क्षेत्राची केली निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या छोट्या पडद्यावर 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका गाजत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर दर्शन घडले आहे. त्यांनी साकारलेली आसावरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेत त्या एका मुलाची आई आहेत. खासगी आयुष्यातही निवेदिता सराफ एका मुलाच्या आई आहेत. अनिकेत सराफ हे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव आहे. पण अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट चोखाळली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

खरं तर अशोक सराफ यांचे जवळचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांची मुले अभिनय बेर्डे, श्रिया पिळगावकर आणि आदिनाथ कोठारे त्यांच्या वडिलांच्याच क्षेत्रात नाव कमावत आहेत. पण अनिकेत सराफ मात्र याला अपवाद ठरला आहे. विशेष म्हणजे हे वेगळे क्षेत्र निवडून त्याने आई निवेदिता सराफ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कोणत्या क्षेत्रात अनिकेतने करिअर केले आहे, जाणून घेऊयात...  

अभिनेता नव्हे तर शेफ आहे अनिकेत सराफ...
अनिकेत सराफ एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत.

आईचे स्वप्न केले पूर्ण...
एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी सांगितले, की मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी स्वप्नपुर्ती केली आहे. वडील अशोक सराफ यांना अनिकेतच्या हातच्या ब्राऊनी खूप आवडतात. तर आई निवेदिताला अनिकेतने बनवलेला मार्बल केक आवडतो.

बातम्या आणखी आहेत...