आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर (जि. जळगाव) - फडणवीस सरकारच्या अखेरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘माझ्यावर झालेले आरोप घेऊन येथून मला जायचे नाही, माझ्याकडे अनेकांंची पुराव्यासह प्रकरणे आहेत, मात्र माझ्यासारखी गत इतरांची होऊ नये म्हणून गप्प आहे,’ अशी खदखद व्यक्त केली. तसेच रावेरच्या मेळाव्यात ‘पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, जनता आपल्या पाठीशी आहे,’ असे ठणकावून सांगितल्याने खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम आहे. गेली ३० वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून येत असलेले खडसे यंदाची निवडणूक लढवतात की नाही, याविषयी सस्पेन्स वाढला आहे.


मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून नाराज असलेले खडसे पक्षावर नाराज आहेत. अंतर्गत स्पर्धेतून खडसेंचे पंख छाटण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेेेनेशी युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय ऐनवेळी घेऊ, असे खडसेंनी सांगितले आहे. मात्र त्यांनीच निवडणूक लढवावी असा समर्थकांचा आग्रह आहे. दुसरीकडे मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला साेडण्याचे वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरले असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील करत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरची जागा काेणाकडे जाईल, याविषयी संभ्रम आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र अनेक वर्षांपासून पराभवच हाेत असल्याने आघाडीच्या गाेटात शांतताच आहे. वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड मात्र यंदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.


संभाव्य उमेदवार
भाजपकडून एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डाॅ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ.


हे प्रश्न अद्यापही कायम
मुक्ताईनगरजवळून पूर्णा नदी वाहते. तरीही या शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात गढूळ व गाळमिश्रित पाणी प्यावे लागते. २० वर्षात वारंवार आश्वासने देऊनही मुक्ताई उपसा सिंचन, कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजना पूर्ण झालेली नाही. बोदवड तालुक्यातही पाणीप्रश्न गंभीर आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योगधंद्यांचा अभाव आहे. 

 

 

२०१४ विधानसभा काैल
एकनाथ खडसेे       भाजप      ८४,९१३
चंद्रकांत पाटील    शिवसेना     ७५,६१७
अरुण पाटील       राष्ट्रवादी     ०६,४७९

 

लोकसभेतील काैल

> भाजप : १ लाख ७,३८३
> काँग्रेस : ४७ हजार ५३०