आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 23 कलादालनांनी सजणार 'इफ्फी'मधील स्मरणरम्य काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 'इफ्फी'चे (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. गोव्यात पणजी येथे आता इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र आहे. यंदा पन्नासावा इफ्फी पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. चित्रपटांच्या सोबतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) भरवण्यात येणारे प्रदर्शन हे नेहमीच इफ्फीचे एक आकर्षण असते. हे समीकरण सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या निमित्ताने नव्या वळणावर आले आहे.


इफ्फीचा संपूर्ण इतिहास, महत्त्वाचे टप्पे, चित्रपट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कलावंतांची सर्व माहिती, छायाचित्रे, पोस्टर्स यांना मल्टिमीडियाची अनोखी जोड देत यंदा एनएफएआयतर्फे तब्बल २३ कलादालनांचा नजराणा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.


संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, 'यंदा इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने आम्हीही वेगळा विचार केला आणि प्रेक्षकांना काही तरी वेगळे, अनोखे देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय तसेच जागतिक चित्रपटांचा आढावा मांडणारी २३ कलादालने (इन्स्टॉलेशन्स) आम्ही सज्ज करत आहोत. चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवणारे कलाकार विविध 'पिलर्स'वर अवतरणार आहेत. सेल्फी पॉइंटमध्येही नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक फन पॉइंट्स निर्माण केले आहेत. बिहाइंड द सीन्स या शीर्षकांतर्गत पडद्यामागील महत्त्वाच्या कलाकारांना समोर आणत आहोत. फ्लिप बुक्सद्वारे रसिक इतिहास जाणून घेऊ शकतील. टचस्क्रीन सुविधाही असेल. इफ्फी रसिकांना एनएफएआयच्या या कलादालनांचे निमंत्रण देणारे ड्रोन असेल. इफ्फीचे बोधचिन्ह असणारा 'मयूर' या दालनांमध्ये रसिकांसोबत असेल.
इफ्फीच्या कलादालनात 'आवारा'चे मूळ पोस्टर िदसणार आहे

ही आहेत प्रमुख आकर्षणे
एकूण २३ कलादालने बोधचिन्हासोबत प्रदर्शनाचा आस्वाद सेल्फी पॉइंट्स व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म्स टच स्क्रीन्स, फ्लिप बुक्स, ड्रोन्स, पिलर्स स्मरणीय इफ्फीमध्ये पेन, टी-शर्ट, पेनड्राइव्ह, कीचेन्स, बॅग्ज

प्रदर्शनातून ज्ञान, माहितीचे भांडार
सुवर्णमहोत्सवी इफ्फी अशीच यंदाच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. मल्टिमीडियाच्या साह्याने प्रदर्शन अधिकाधिक परस्परसंवादी (इंटरअॅक्टिव्ह) करण्याचा प्रयत्न आहे. प्रदर्शनातून ज्ञान, माहितीचे भांडार तर मिळेलच, पण मनोरंजन होईल. फनटाइम असेल. ते रसिकांना गुंतवून ठेवेल. पहिल्या इफ्फीपासूनचा प्रवास यातून उलगडेल. प्रकाश मगदूम, संचालक - एनएफएआय
 

बातम्या आणखी आहेत...