Home | National | Delhi | This year rain will come much better than last year

यंदा पाऊस सरासरी गाठणार, जून ते सप्टेंबर काळात ९६% पाऊस पडण्याची शक्यता

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 08:50 AM IST

देशातील सर्व राज्यांत यंदा चांगल्या पावसाचे वितरण

 • This year rain will come much better than last year

  नवी दिल्ली- यंदा देशात सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत दीर्घावधी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) या वर्षीच्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा पहिला अंदाज सोमवारी जाहीर केला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर आणि आयएमडीचे महासंचालक के. जे. रमेश यांनी पत्रकार परिषदेत हा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले की, या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात पाऊस सरासरीइतका होइल. दीर्घावधीत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या चार महिन्यांत देशात सरासरी ८९ टक्के पाऊस होतो.


  नायर म्हणाले, नैर्ऋत्य मोसमी हवामान आतापर्यंत सामान्य स्थिती आहे. अशा स्थितीत पाऊस सरासरीइतका होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाबाबतचा दुसरा दीर्घावधीचा अंदाज मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.


  खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा पावसाळ्यात दीर्घावधीच्या सरासरीच्या ९३ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. मागील वर्षी देशात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला होता. आयएमडीने मागील वर्षी ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्षात ९०.३४ टक्के पाऊस झाला होता, तर २०१७ मध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज होता, प्रत्यक्षात ९४.५३ टक्के पाऊस झाला होता.

  अशी ठरते श्रेणी : १९५१ ते २००० या काळातील मोसमी पावसाच्या सरासरीच्या आधारे या वर्षींच्या पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. ही सरासरी ८९ सेंटीमीटर आहे. पावसाळ्यात ९० ते ९५ टक्के पाऊस झाला तर त्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस या श्रेणीत ठेवले जाते. तर ९६ ते १०४ टक्के पाऊस झाला तर सरासरीइतका पाऊस आणि १०५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्यास तो अतिपाऊस या श्रेणीत मोडतो.


  अल निनोचा परिणाम नाही
  यंदाच्या पावसाळ्यात अल निनोची स्थिती कमकुवत राहण्याने पावसाळ्याच्या अखेरच्या दोन महिन्यांत (ऑगस्ट आणि सप्टेंबर) याची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पावसाचे वितरणही क्षेत्रनिहाय चांगले राहून, खरिपातील पिकांना त्याचा लाभ होईल.


  ९ वर्षांत ७ वेळा चुकले अंदाज : मागील ९ वर्षांत (२०१० ते २०१८ ) या काळात आयएमडी कडून जाहीर करण्यात आलेल्या दीर्घकालीन अंदाजापैकी केवळ २०१० आणि २०१७ चा अपवाद वगळता ७ वेळा अंदाज चुकीचे ठरले.


  वर्ष अंदाज प्रत्यक्ष
  २०१० ९८ आणि १०२ १०२%
  २०११ ९८ आणि ९५ १०२%
  २०१२ ९९ आणि ९६ ९३%
  २०१३ ९८ आणि ९८ १०६%
  २०१४ ९५ आणि ९३ ८८%
  २०१५ ९३ आणि ८८ ८६%
  २०१६ १०६ आणि १०६ ९७%
  २०१७ ९६ आणि ९८ ९५%
  २०१८ ९७ आणि ९७ ९१%


  या वर्षी असा राहील पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
  श्रेणी टक्केवारी शक्यता
  कमी पाऊस ९०% १७%
  सरासरीहून कमी ९० -९६% ३२%
  सरासरीइतका ९६-१०४ % ३९ %
  सरासरीहून जास्त १०५-११० % १०%
  अति पाऊस ११०% २%


  जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा ५ टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता
  यंदा सर्व विभागांत चांगल्या पावसाची शक्यता
  मान्सूनच्या आगमनाची तारीख हवामान विभाग १५ मे रोजी जाहीर करणार आहे.

Trending