आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीपेक्षा ७ लाख हेक्टरवर वाढणार ! राज्यात उशिरा आलेल्या व परतीच्या पावसाचा दिलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतोष देशमुख 

औरंगाबाद - संपूर्ण हंगामाचे भवितव्य ज्या मोसमी पावसावर अवलंबून असते त्या लहरी पावसाने यंदा सुरुवातीचे तीन हमखास पाऊस पडणाऱ्या महिन्यांत  दगा दिला होता. खंडाने व काही वेळेत पडलेल्या पावसाने मराठवाड्यात बहुतांश खरीप पिकांची माती झाली. मात्र रब्बी पिकांबाबतचे चित्र आशादायी आहे. सप्टेंबरमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने व ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने रब्बी पेरणीला संजीवनी मिळाली आहे.  यंदा सरासरी ५६ लाख ९३ हजार १५९ हेक्टर पेक्षा अधिक पाच ते सात लाख हेक्टरने पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने रब्बी पेरणी अहवालात नमूद केले आहे.   

राज्यात रब्बीचे ५६ लाख ९३ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या पैकी ३० लाखांवर शाळू ज्वारी व उर्वरित क्षेत्रावर गहू, करडई, मका, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. गतवर्षी भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे कशीबशी ५९ टक्केच रब्बी पेरणी पूर्ण झाली होती. तर बदलत्या हवामानामुळे यंदा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. जुलैत कमी पाऊस पडला. स्थळनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक आहे. काही ठिकाणी मुसळधार, अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मूग, उडदाची १०० टक्के पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, बाजरी, ज्वारीचे रान लवकरच खाली होत असून त्यावर रब्बी पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.  परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा गहू,  हरभरा,  मका आणि उन्हाळी बाजरी व भाजीपाला पिके चांगली पिकणार असल्याचे कृषी विभागाने रब्बी अहवालात नमूद केले आहे.

औरंगाबादेतील ३ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जालना जिल्ह्यातील एका तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून ७ तालुक्यांत ५० ते १०० टक्के दरम्यान पाऊस झालेला आहे. बीड जिल्ह्यात ९ तालुक्यांत ५० ते १०० टक्के,  शिरूर कासार ३८.९३ टक्के तर केज तालुक्यात ४५.२१ टक्के म्हणजेच राज्य सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. तसेच १ जून ते ३० सप्टेंबर १२० दिवसांपैकी निम्म्या दिवसांतील काही वेळेत पाऊस पडलेला आहे. जून २० ते २१ दिवस, जुलै १३ ते २० आणि ऑगस्टमध्ये २४ ते २८ दिवसांचा दिर्घ खंड पडलेला आहे.  
 

पेरणी क्षेत्र वाढणार
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात रब्बी ज्वारी ५.२५ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्यापैकी यंदा ४.१५ लाख हेक्टरवर म्हणजे २१ टक्क्यांनी पेरणीत घट होईल. गहू पेरणीसाठी यंदा पाणी असल्याने ज्वारी क्षेत्रात घट होणार असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. तर गव्हाचे १.१७ लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १.५९ लाख हेक्टरवर म्हणजे ३६ टक्के वाढ, हरभरा सरासरी क्षेत्र १.३४ लाख हेक्टरच्या तुलनेत २.९३ लाख म्हणजे ११९ टक्के, करडई १२ टक्क्यांनी घट तर मक्यात ९८ टक्क्यांची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 

गहू, हरभरा क्षेत्रात या हंगामात वाढ होण्याची शक्यता
लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गतवर्षी ११ लाख १४ हजार २३० हेक्टरवर रब्बी क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख ८४ हजार ४५९ म्हणजे ७० टक्केच रब्बी पेरणी झाली होती. यंदा १२ लाख ९५ हजार ८६२ हेक्टरवर रब्बी पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. ज्वारी, गहू, हरभरा क्षेत्रात वाढ होणार आहे.