आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Year's Ensemble Presentation Of Four Konkani Films Including 'Bade Abu', 'Cajaro' In Iffi

‘बडे अब्बू’, ‘काजरो’सह चार कोंकणी चित्रपटांचे यावर्षी इफ्फीत सादरीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीश गोवंडे 

पणजी - मांडवीकिनारी २० नोव्हेंबरपासून आयोजित होत असलेल्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीमध्ये गोव्यातील चार कोंकणी चित्रपटांची ‘गोवा प्रीमियर विभागा’मध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये झारखंड राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कारांची बेगमी करणाऱ्या ‘बडे अब्बू’,  मामि चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन स्टोरीज्’ विभागामध्ये निवड झालेला ‘काजरो’ या दोन्ही बहुचर्चित चित्रपटांसह ‘दुलू’ आणि ‘रणसांवट’ या चित्रपटांचाही समावेश आहे.इफ्फी गोव्यात स्थिरावल्यानंतर ५ वर्षांपूर्वी माजी माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘गोवा विभागा’ची घोषणा केली होती. या विभागामध्ये गोव्यातील निर्मात्यांच्या व्यावसायिक स्तरावर अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांची विशेष निवड करण्यात येत असते. यामध्ये या वर्षासाठी शांती दिलीप बोरकर यांचा ‘बडे अब्बू’, राजेश पेडणेकर यांचा ‘द काजरो’ या राज्यात आणि राज्याबाहेरही चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेल्या यावर्षीच्या दोन आशयघन कोंकणी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘रणसांवट’ आणि ‘दुलू’ या दोन चित्रपटांचाही यात समावेश आहे. यावर्षी या विभागासाठी एकूण दहा चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या, त्यातील चार चित्रपटांची निवड करण्यात आली. तर लघुपट, माहितीपट विभागात आलेल्या पाच प्रवेशिकांतून ‘१२५ इयर्स तियात्र’ या तियात्राचा इतिहास विशद करणाऱ्या माहितीपटाची आणि ‘व्हाय? किद्याक?’ या दोन लघुपटांची निवड करण्यात आली आहे. या विशेष विभागातील सिनेमाचे परीक्षण ज्येष्ठ सिनेसमीक्षक अनंत विजय, दिग्दर्शक कामख्या नारायण सिंह, टीव्ही अभिनेते अशोक फळदेसाई यांनी केले.