Home | Maharashtra | Pune | This year's famine strikes the state of seven thousand thousand Katie

या वर्षीच्या दुष्काळात साडेसात हजार काेटींचा राज्याला फटका: केंद्राकडे मागणार मदत- मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 07:15 AM IST

परतीच्या पावसाने दगा दिल्याने रब्बी हंगामाचेही अतोनात नुकसान

 • This year's famine strikes the state of seven thousand thousand Katie

  पुणे - यंदा पावसाने दगा दिल्याने राज्यातील ८५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या एकूण नुकसानीचा आकडा साडेसात हजार कोटी रुपयांवर जाण्याची भीती असून याची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली आहे. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सर्वाधिक तब्बल सव्वापाच हजार कोटींचे नुकसान हाेणार असल्याची भीती राज्य कृषी अायुक्तालयाने राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात व्यक्त करण्यात अाली अाहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने रब्बी हंगामाचेही अतोनात नुकसान झाले आहे. सरासरी क्षेत्राच्या जेमतेम १३ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पेरा झालेल्या पिकांची अवस्थाही बिकट आहे.


  जून, जुलै आणि आॅगस्टच्या मध्यापर्यंत थाेडीफार हजेरी लावल्यानंतर निम्म्या राज्यातून पाऊस गायबच झाला. सप्टेंबर महिन्यात तर पावसाने पुरती दडी मारली. त्यामुळे उगवलेल्या पिकांनी माना टाकल्या. सोयाबीन, तुरीच्या शेंगा पोसल्या नाहीत. कापूस बोंडे वाढलीच नाहीत. वाढीच्या अवस्थेतल्या इतर पिकांची अशीच दुरवस्था झाली. परिणामी उत्पादकतेत मोठी घट आढळून येत आहे. मराठवाड्यातील फळबागांचे माेठे नुकसान झाले आहे.

  ऊस वगळून राज्यातले सरासरी खरीप पेरणी क्षेत्र १४० लाख हेक्टर आहे. उसाचे क्षेत्र ९.७४ लाख हेक्टर आहे. ऊस पीक वगळता यंदा १३९.३८ लाख हेक्टर पेरण्या झाल्या होत्या. यातल्या ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात झळ बसली आहे. कापूस, उशिरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी, भात या पिकांचे नुकसान जास्त आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला दुष्काळाचा फटका बसला आहे. तुरीचा पेरा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. मात्र, शेंगा भरण्याच्या कालावधीतच पाऊस न झाल्याने तुरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल, असा अंदाज आहे.

  मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता जास्त
  औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा अपवाद वगळता इतर तालुक्यांतही नुकसान मोठे आहे. राज्यातल्या ३ लाख ९२ हजार हेक्टर फळबागा दुष्काळाच्या तडाख्यात आहेत. हे नुकसान १८३ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातल्या मोसंबी आणि डाळिंबाच्या बागांचे नुकसान जास्त आहे.

  केंद्राकडे मागणार ७ हजार काेटींची मदत : मुख्यमंत्री

  महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या वेगाने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करण्याची पहिलीच वेळ अाहे. केंद्राकडे ७ हजार काेटींच्या मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवला जाणार आहे. केंद्राने दुष्काळ पाहणीसाठी तातडीने पथक पाठवावे, अशी मागणी करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेत सांगितले. या वर्षी प्रथमच ३१ ऑक्टोबरला दुष्काळाची घोषणा करून उपाययोजना लागू केल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी येथे सांगितले.

Trending