मतदारांसाठी मोठी सुविधा / यंदाच्या निवडणुकीत लिफ्ट नसलेल्या इमारतीतील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर

मतदार 60 लाखांनी वाढले, महिला लक्षणीय, मतदान केंद्रांची संख्याही सव्वापाच हजारांनी वाढली

विशेष प्रतिनिधी

Oct 09,2019 10:36:00 AM IST

सचिन काटे | मुंबई
२०१४ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदारांच्या संख्येत ५९ लाख १७,९०१ एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे. यात महिला मतदारांची वाढलेली संख्या लक्षणीय आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांव्यतिरिक्त


साडेसहा लाख कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. लिफ्ट नसलेल्या इमारतीतील सर्व मतदान केंद्रे या वेळी तळमजल्यावरच ठेवावीत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. मतदान केंद्रांची संख्याही ५,३२५ ने वाढवण्यात आली आहे.


२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारांची संख्या ८.९४ कोटी ४६,२११ एवढी आहे. यात ४.६७ कोटी ३७,८४१ पुरुष, तर ४.२७ कोटी ५,७७७ महिला मतदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ३.९४ कोटी ५,६०१ महिला मतदार होत्या. तृतीयपंथी मतदारांची संख्याही ९७२ वरून २५९३ वर गेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे ९२५ असे महिलांचे प्रमाण आहे. मात्र २०१४ मध्ये महिलांचे हेच प्रमाण फक्त ८८९ इतके होते. या वेळी यात ९१४ प्रति १ हजार पुरुष, अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.


विधानसभा निवडणुकांसाठी ६.५० लाख कर्मचारी
निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडाव्यात या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले जात आहे. याशिवाय सुमारे ६.५० लाख कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले गेले आहे. महाराष्ट्रात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहे.


टोलफ्री क्रमांकसह विविध अॅपची सुविधा
c-Vigil या अॅपवर नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते. दिव्यांगांना मतदान केंद्र-व्हीलचेअरची मागणी नोंदवण्यात साठी pwD हे अॅप आहे. New Suvidha अॅपद्वारे राजकीय पक्ष प्रचारसभांची परवानगी घेऊ शकतात. 1950 ही हेल्पलाइन मतदारांना सर्व प्रकारची माहिती देईल.


दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
अनेक मतदान केंद्रे तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर असतात. तेथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जाण्यास त्रास होतो. यामुळे निवडणूक आयोगाने जेथे लिफ्ट नसेल तेथील मतदान केंद्रातील तळमजल्यावरच ठेवावे, असे निर्देश दिले आहेत. केंद्रावर व्हीलचेअर तसेच रॅम्पची सोय करण्याचेही निर्देश दिले आहेत.


निवडणूक आयोग सज्ज
आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे म्हणून राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना केलेली आहे. मतदार जागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. या वेळी विविध अॅपचा उपयोग केला जात आहे. तसेच लिफ्ट नसलेल्या इमारतीत प्रथमच तळमजल्यावरच मतदान केंद्रे ठेवण्यात येणार आहेत. - दिलीप शिंदे, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

X