आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसा घडवणाऱ्यांना धर्म नसतोच, अशांतता पसरवणे हाच त्यांचा ‘धर्म’; सिडको, जिन्सी पोलिस ठाण्यात झाल्या नागरिकांच्या बैठका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोणताच धर्म हिंसेचे समर्थन करीत नाही. हिंसा घडवणाऱ्यांना कुठलाच धर्म नसतो. केवळ अशांतता निर्माण करणे हाच त्या विकृत लोकांचा धर्म असतो. त्यामुळे अशा घटनांवरून कुणीच कुठल्याच धर्माला लक्ष्य करू नये. यापुढे शहराचा सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू, त्यातच सर्वांचे भले आहे, अशी भूमिका शांतता समित्यांच्या बैठकांमध्ये सर्वधर्मीयांनी मांडली. धार्मिक रंग आलेल्या दोन घटनांनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिन्सी आणि सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी तातडीने शांतता समितीच्या बैठका झाल्या.


रविवारी रात्री घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दुपारी एक वाजता सर्व उपायुक्त आणि सर्व पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी धर्माशी निगडित घटनांवर आळा घालण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामध्ये शांतता समित्यांच्या बैठका घेण्याबाबतही सुचवले होते. त्यानुसार सायंकाळी काही ठाण्यांमध्ये बैठका झाल्या. जिन्सी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीस एमआयएमचे डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, नगरसेवक सलीम सारा, अय्युब जहागीरदार, जफर बिल्डर, सांडू शेरखान, जायभाये, मीर हिदायत अली, बाळू कुलकर्णी, पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यासह सर्वधर्मीय नेते आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. याशिवाय सिडको, मुकुंदवाडी, बेगमपुरा या पोलिस ठाण्यांमध्येही शांतता समित्यांच्या बैठका झाल्या. सर्वच ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये सर्वधर्मीय मान्यवरांनी शांततेचे आवाहन केले. एखाद्या घटनेमुळे संपूर्ण धर्मालाच दोषी धरणे आणि त्यावरून समाजातील तरुणांना भडकावणे चुकीचे आहे. असे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत, असे आश्वासन या मान्यवरांनी दिले.


ती घटना मॉब लिंचिंगची नाही : आझाद चौकामध्ये रविवारी रात्री घडलेल्या घटनेचा आणि मॉब लिंचिंगचा काहीही संबंध नाही. शहराच्या शांततेला धोका पोहोचवण्याचे काम काही लोक करीत आहेत. पोलिसांनी यातील नेमके तथ्य शोधून दोषींविरुद्ध कारवाई केली पाहिजे. काही नशेखोर तरुण या भागात कायम असतात. त्यांच्याकडूनच मारहाण, गुंडगिरीचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. शहरात मादक पदार्थांची विक्री जोरात सुरू आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.


दोन समुदायात भांडण लावण्याचे काम : किरकोळ आणि वैयक्तिक वादामध्ये धर्म आणला जात आहे. दोन समुदायांमध्ये भांडणे लावण्याचे हे काम आहे. रविवारच्या घटनेत अटक केलेले आरोपी हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी, निर्दोष असणाऱ्यांची सुटका करावी, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवाजी दांडगे, अभिजित देशमुख, मिलिंद साखरे, दादाराव औताडे, मनोज गायके, रावसाहेब औताडे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.
 

रात्री अकरानंतर हॉटेल्स, पानटपऱ्या बंद करणार
शहरातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, पानटपऱ्या सुरू असतात. यापुढे रात्री ११ नंतर शहरातील एकही हॉटेल, पानटपरी सुरू राहणार नाही. जर कुणी सुरू ठेवलेच तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.

 

अफवा पसरवणाऱ्या वेब पोर्टलवर गुन्हा दाखल करणार : पोलिस आयुक्त 
शहरात किरकोळ घटना घडली तरी काही न्यूज वेब पोर्टलवर भडकावू बातम्या प्रकाशित करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. अशाच काही वेब पोर्टल्सची माहिती आम्ही काढली असून त्यांच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

 

नशेखोरांवर लक्ष, रात्री गस्त
शहरातील विविध भागांमध्ये १८ ते २२ वयोगटातील बरीच मुले नशा करतात. अशा मुलांमुळेही अनेक गुन्हे घडले आहेत. त्यामुळे नशेखाेरांवर आमचे लक्ष असून त्यांच्यावर कारवाई करू. याशिवाय रात्री नऊ ते १२ या वेळेत रोज शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकेबंदी करणार आहोत, असे पाेलिस आयुक्तांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...