विधानसभा 2019 / विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवल्याविना स्वस्थ बसायचे नाही

साताऱ्याच्या सभेत शरद पवार यांची उदयनराजेंचे नाव न घेता टीका

Sep 23,2019 09:38:18 AM IST

सातारा : राष्ट्रवादीच्या खासदारकीचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत गेलेले उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भाेसले या बंधूंवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यातील जाहीर सभेत टीका केली. स्वातंत्र्यानंतर भारतावर पाकिस्तान, बांगलादेश, चीनकडून हल्ले झाले, मात्र या भागात जन्मलेल्या जवानांनी ते हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते यशवंतराव चव्हाण याच मातीतले. त्यामुळे हा जिल्हा विचारांशी प्रतारणा करणार नाही याची खात्री आहे. आणि ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही, असा इशाराही त्यांनी राजेंचे नाव न घेता दिला.
रविवारी साताऱ्यात आलेल्या शरद पवारांनी रयत शिक्षण संंस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन केले. नंतर शहरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. तत्पूर्वी तरुणाईकडून त्यांचे जाेरदार स्वागत करून एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच करण्यात आले.

सभेत पवार म्हणाले, 'आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना मदत न करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. या सरकारने 'ऐतिहासिक' निर्णय घेतला, महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा. आता शौर्याचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यात छमछम होणार आहे... हे काय चालले आहे?' असा संतप्त सवालही पवार यांनी सरकारला केला.


पक्ष बदलणाऱ्यांचा समाचार
शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच आदर आहे. पुरंदर किल्ल्याचा तह झाला. मिर्झाराजे आले, पण छत्रपतींनी किल्ले सोडले नाही. छत्रपतींना दिल्लीत चुकीची वागणूक दिली गेली. आपल्या स्वाभिमानाकरिता महाराज तिथून उठून गेले. दिल्लीत स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून महाराजांनी सहन केले नाही. मात्र आज? 'हे बरं नव्हं' असा टोला त्यांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना उद्देशून लगावला.


तुम्हाला-आम्हाला छत्रपतींच्या गादीचा आदर आहे. महाराष्ट्राला ज्यांनी शौर्य शिकवले त्यांची ती गादी आहे. तरी काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. लोकशाही आहे .तो त्यांचा अधिकार आहे,' असेही पवार म्हणाले.

X